युतीतील चर्चेच्या गुऱ्हाळाने कार्यकर्तेही संभ्रमात

दत्ता देशमुख
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

बीड - राज्यात भाजप-शिवसेनेची युती झालेली असताना जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांत अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ थांबायला तयार नाही. बीडमध्ये मतांचे विभाजन होण्यासाठी दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक युती करीत नसल्याची टीका विरोधकांसह घटक पक्षांतून होत असतानाही दोन्ही पक्षांकडून अद्याप युतीबाबत घोषणा व्हायला तयार नाही. परिणामी कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

बीड - राज्यात भाजप-शिवसेनेची युती झालेली असताना जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांत अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ थांबायला तयार नाही. बीडमध्ये मतांचे विभाजन होण्यासाठी दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक युती करीत नसल्याची टीका विरोधकांसह घटक पक्षांतून होत असतानाही दोन्ही पक्षांकडून अद्याप युतीबाबत घोषणा व्हायला तयार नाही. परिणामी कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

जिल्ह्यात सहा पालिकांच्या निवडणुका होत आहेत. परळीत युती करून भाजप उमेदवाराची "सेफ साईड' करून घेण्याची खेळी सुरवातीलाच पंकजा मुंडेंनी खेळली; पण इतर पाच ठिकाणच्या युतीचा घोळच आहे. दरम्यान, सुरवातीला युतीत शिवसेनेने बीडसह माजलगाव आणि अंबाजोगाई या तीन ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या उमेदवारीवर दावा सांगितला होता. युतीच्या बोलणीचा घोळ सुरूच असतानाच उमेदवारी अर्ज करण्याची मुदत संपत आल्याने दोघांनीही आपापल्या परीने पक्षाच्या उमेदवाऱ्या दाखल केल्या.

यामध्ये बीड, धारूर व अंबाजोगाईत दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत. माजलगावमध्ये भाजपचा, तर गेवराईत शिवसेनेचा उमेदवार नाही. उमेदवारी अर्जांची छाननी होऊन गेली आणि आता अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ येत आहे. तरीही दोन्ही पक्षांतील चर्चेच्या फेऱ्या संपायला तयार नाहीत. अशी चर्चाच होणार असेल तर प्रचार कधी करणार असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे. बीडमध्ये दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

सध्या दोघांकडून चर्चेत येणारे काही मुद्दे अगदीच निरर्थक आहेत; मात्र मुद्दाम चर्चेचा घोळ कायम ठेवत, "मतांच्या विभाजनासाठी' युतीच होऊ द्यायची नाही की काय, अशी घटक पक्षांकडूनच होणारी शंका आणि आरोप खरा ठरतो की काय असे वाटू लागले आहे. भाजपने सलीम जहॉंगीर यांच्या माध्यमातून मुस्लिम चेहरा समोर केला आहे. तर शिवसेने मराठा समाजातील सुदर्शन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसंग्रामला शह देण्याच्या नादात
महायुतीमधील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यात मागच्या दीड वर्षांपासून राजकीय दुरावा आहे. दोघांकडून एकमेकांना शह-काटशहचे नेहमीच राजकारण होते.

मुंडेंकडे पालकमंत्रिपदासह ग्रामविकास खाते असल्याने या दोन्ही माध्यमांतून होणाऱ्या कामांत शिवसंग्रामला कसे टाळता येईल, याचेच नेहमी प्रयत्न असतात. त्यातच क्षीरसागर समर्थकांना कामांत वाटा देऊनही मेटेंना शह दिला जातो. मेटेंना शह देण्याच्या नादात बीडमध्ये भाजपही "कोमेजलेलेच' राहिले हे विशेष. मुंडेंकडे दोन वर्षांपासून मंत्रिपद असले तरी पक्षबळकटीकरणासाठी बीडमध्ये अपवादानेही प्रयत्न झाले नाहीत. असे असतानाही भाजप या ठिकाणी स्वबळावर लढण्यासाठी आग्रह धरीत आहे.

ओढातानीच्या शंकेला बळ
दरम्यान, शिवसेनेने माजलगावच्या जागेवर दावा केला असून या ठिकाणी उमेदवारीही दाखल केली आहे; मात्र या जागेसाठी हट्ट धरणाऱ्या भाजपने या ठिकाणी उमेदवारच उभा केलेला नाही. जर अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता तर या जागेसाठी आग्रहच का धरला अशी शंका आहे. गेवराईमध्ये शिवसेनेने उमेदवारी दाखल केली नसून माजलगावप्रमाणे आम्हीही या ठिकाणी अपक्ष आघाडीला पाठिंब्याची धमकी शिवसेनेकडून दिली जात आहे. शिवसेनेची ताकद असलेल्या जागाही भाजप देत नसल्याने युतीत मुद्दाम घोळ केला जात असल्याच्या शंकेला बळ येत आहे.

Web Title: member confussed in yuti discussion