त्र्याहत्तर ऐवजी आता सत्तर तीन

सुशांत सांगवे
शुक्रवार, 14 जून 2019

लातूर : गणित शिकवताना त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णव ऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून आपल्या कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड आणि भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा ‘बालभारती’च्या दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात प्रथमच अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांची मने गणितात रमण्यास मदत होणार आहे.

लातूर : गणित शिकवताना त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णव ऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून आपल्या कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड आणि भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा ‘बालभारती’च्या दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात प्रथमच अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांची मने गणितात रमण्यास मदत होणार आहे.

कोणता विषय अवघड वाटतो, असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना विचारला तर आपसुकपणे गणित हे उत्तर मुलांमधून पुढं येतं. मुलांच्या मनातील गणिताची ही भीती दूर सारावी म्हणून इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) महत्वपूर्ण बदल केले आहेत. दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून गणिताबरोबरच मराठी बालभारती, माय इंग्लिश बुक, खेळू करू शिकू या चार विषयांची नवी पुस्तके बाजारात आली आहेत. त्यात गणिताचे पुस्तक लक्षवेधी ठरत आहे.

गणित विषय तज्ञ समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, ‘‘तमिळ, कानडी, तेलगू, मल्याळी या दक्षिण भारतीय भाषांमधील संख्यावाचनाचा अभ्यास केला. तो तेथील विद्यार्थ्यांना सोपाही वाटतो. त्यामुळे आम्ही तशीच पद्धत आपल्या पुस्तकांत आणली आहे. ही आपल्यासाठी नवी पद्धत आहे. तिची आम्ही ओळख करून देत आहोत. कारण अठ्ठावीस, त्रेसष्ठ, त्र्यान्नव, सत्त्याण्णव असे जोडक्षर आले की मुलांना भीती वाटू लागते. त्यात ४७ सारखा शब्द लिहिताना सातचा उच्चार आधी होतो. त्यामुळे मुले आणखीन गोंधळतात. म्हणून या जुन्या पद्धतीऐवजी वीस आठ (२८), साठ तीन (६३), नव्वद आठ (९८) ही नवी पद्धत शिक्षकांना अवलंबण्यास सांगितले आहे. काही मुलांना जुन्या पद्धतीच्या माध्यमातून आधीच संख्यांचे वाचन करायला शिकवले गेले असेल तर त्यांना जी पद्धत सोपी वाटते, ज्या पद्धतीत त्यांचे मन रमते त्याच पद्धतीतून शिक्षकांनी शिकवावे.’’

गणिताच्या पुस्तकाची सुरवात कवितेने
गणिताच्या पुस्तकाचे पान उलगडताच ‘रविवार सगळे शेतावर गेले फिरायला, फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला’ अशी कविता पहिल्याच पानावर पहायला मिळते. गणिताच्या पुस्तकाची सुरवात कवितेने करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यातून मुलांना वेगवेगळे आकार शोधता यावेत, ही त्यामागील कल्पना आहे. अभ्यास म्हणून बेरजा, वजाबाकी दिले की मुले कंटाळतात. त्यामुळे त्यांना आवडतील असे खेळ पुस्तकात देण्यात आले आहेत. पुस्तकाचा शेवट गोष्टीने करण्यात आला आहे. हे आणखी एक या पुस्तकाचे वेगळेपण आहे. 

गणित मुलांना आवडावे, अधिक सोपे, इन्ट्रेस्टिंग वाटावे म्हणून यंदाच्या दुसरीच्या गणिताच्या विषयात महत्वाचे बदल केले आहेत. बेसिक गणिताला धक्का लावता केलेले हे बदल आहेत. ते मुलांबरोबरच शिक्षकांनाही नक्कीच आवडतील. 
- डॉ. मंगला नारळीकर, 
अध्यक्षा, गणित विषय तज्ञ समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: method of Maths changes