नऊ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; मतदानासाठी प्रशासन सज्ज

लातूर - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील ५१ केंद्रांवर मतदान होणार असून तीनशेपेक्षा जास्त मतदार असलेल्या नऊ मतदान केंद्रांवर प्रशासनाने सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी दिली.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तीन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात ५१ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा हजार १८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाच्या वतीने साठ मतदान केंद्राध्यक्ष व दोनशे मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत अन्य कर्मचारी व पोलिसांचा बंदोबस्तही नियुक्ती करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात अन्य प्रक्रियेसोबत मतदान करणाऱ्या शिक्षकांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला (Right Hand Middle Finger) शाई लावण्याच्या सूचना प्राधान्याने दिल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

तीनशेपेक्षा जास्त मतदार असलेल्या जिल्ह्यातील नऊ केंद्रांवरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात केंद्र सरकारच्या कार्यकक्षेतील बॅंक व वीमा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
 
मतदानासाठी नैमित्तिक रजा
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकांना तीन फेब्रुवारी रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हे निर्देश दिले आहेत. ही रजा शिक्षकांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Micro Observers appointed nine polling centers