एमआयडीसीचे भूसंपादन; इंधन कंपन्यांकडून झोपेचे सोंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद - पानेवाडीला पर्याय म्हणून औरंगाबादलगत सटाणा येथे ऑईल डेपो उभारण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या; मात्र डेपो उभारणीसाठी झालेल्या बैठकांच्या सत्रांमध्ये हजेरी लावणाऱ्या इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेत अद्याप एमआयडीसीकडे या डेपोची लेखी मागणीच केलेली नाही. 

औरंगाबाद - पानेवाडीला पर्याय म्हणून औरंगाबादलगत सटाणा येथे ऑईल डेपो उभारण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या; मात्र डेपो उभारणीसाठी झालेल्या बैठकांच्या सत्रांमध्ये हजेरी लावणाऱ्या इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेत अद्याप एमआयडीसीकडे या डेपोची लेखी मागणीच केलेली नाही. 

पानेवाडी येथून औरंगाबाद आणि मराठवाड्यातील अन्य शहरांत इंधन आणण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी औरंगाबादेत ऑईल (इंधन) डेपो देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने खासदार चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्याला तत्त्वतः मान्यताही मिळाली. त्यावर औरंगाबादेत बैठका घेतल्यावर शेंद्रा येथील ‘ऑरिक’लगत सटाणा गावाची १३८ हेक्‍टर जागा यासाठी निवडण्यात आली. या जागेची निवड होऊन संयुक्त मोजणीचा प्रस्ताव एमआयडीसीने तयार केला. त्यासाठी आवश्‍यक अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्यावर आता विषय संयुक्त मोजणीवर येऊन ठेपला आहे. एकीकडे एमआयडीसीने कारवाई वेगाने पुढे नेलेली असताना इंडियन ऑईल, एचपीसीएल, बीपीसीएल यापैकी एकाही कंपनीने डेपोसाठी जागा हवी असल्याची लेखी मागणी कळवलेलीच नसल्याने या जागेवर नेमका ऑईल डेपो होणार, की उद्योगांना ही जागा जाणार याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. ऑईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय विभागीय पातळीवरील असल्याचे सांगितले.

सटाणाच का? 
सटाणा हे गाव औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’लगत आहे. पायाभूत सुविधांचा विकास येथे मोठ्या प्रमाणावर झाला असून, या गावातील जागेवर थेट काम सुरू करता येणार आहे. सटाण्यालगत जाणाऱ्या रेल्वे लाइनच्या माध्यमातून इंधनाची ने-आण सोपी आहे; अन्यथा यासाठी नव्याने जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. 

सटाणा येथे ऑईल डेपोसाठी जागा घेण्याकरिता उद्योगमंत्र्यांसह झालेल्या बैठकांनतर भूमी अधिग्रहणाची कारवाई एमआयडीसीने सुरू केली आहे; पण त्यांना या डेपोसाठी जागा हवी अशी कोणतीही लेखी मागणी एमआयडीसीकडे अद्याप आलेली नाही. 
- सोहम वायाळ, विभागीय अधिकारी, एमआयडीसी.

Web Title: MIDC Land Acquisition fuel company