एमआयडीसीने घेतला २० एकरांचा भूखंड परत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

ज्वलनशील गोष्टींची वारेमाप साठवणूक करीत शेंद्रा येथील आगीच्या मोठ्या घटनेला एक कंपनी जबाबदार ठरली होती. उद्योग महामंडळाच्या नियमावलीला हरताळ फासणाऱ्या शेंद्रातील या कंपनीचा भूखंड एमआयडीसीने सोमवारी (ता. सहा) ताब्यात घेतला.

औरंगाबाद - ज्वलनशील गोष्टींची वारेमाप साठवणूक करीत शेंद्रा येथील आगीच्या मोठ्या घटनेला एक कंपनी जबाबदार ठरली होती. उद्योग महामंडळाच्या नियमावलीला हरताळ फासणाऱ्या शेंद्रातील या कंपनीचा भूखंड एमआयडीसीने सोमवारी (ता. सहा) ताब्यात घेतला. 

ता. २२ एप्रिल रोजी शेंद्रा येथे भंगारच्या गोदामाला लागलेली आग आटोक्‍यात आणताना अग्निशमन यंत्रणेच्या तोंडाला फेस आला होता. आगीच्या या घटनेत झालेली नियमांची पायमल्ली ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणली होती. तब्बल तीन लाख लिटर पाणी वापरूनही ‘साई एंटरप्रायजेस’च्या गोदामाला लागलेली आग आटोक्‍यात आली नव्हती. बारा तास धुमसलेल्या या आगीने आंब्याची शंभर झाडे, मोबाईल टॉवर आणि विद्युत यंत्रणेला आपल्या कवेत घेतले होते.

एमआयडीसीच्या अटी-शर्तींची पूर्तता न करता वारेमाप लाकूड या जागेवर ठासणाऱ्या या कंपनीवर एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाने धडाकेबाज कारवाई केली आहे. बीसीसी सर्टिफिकेट आणि अग्निशमन यंत्रणा नसलेल्या या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, त्यांच्या ताब्यातील प्लॉट परत घेतल्याची माहिती विभागीय अधिकारी अनिल गावित यांनी ‘सकाळ’ला दिली. या २० एकरांच्या भूखंडाचा पंचनामा करून घेऊन या प्लॉटचा ताबा घेतल्याचे ते पुढे म्हणाले. या जागेवर एमआयडीसीचा सुरक्षारक्षक बसविण्यात येण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना पत्र रवाना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईसाठी दिलीप शिरोळे, सर्जेराव श्रीखंडे आणि संजय जाधव यांनी शेंद्रा येथे जाऊन पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIDC Land Return Sakal Impact