एमआयडीसीचे पाणी अशुद्ध; नागरिकांच्या तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (ता. दहा) सिडको एन-1 येथून टॅंकर भरण्यास सुरवातही झाली; मात्र हे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत; मात्र हे पाणी पूर्णपणे प्रक्रिया केलेले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (ता. दहा) सिडको एन-1 येथून टॅंकर भरण्यास सुरवातही झाली; मात्र हे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत; मात्र हे पाणी पूर्णपणे प्रक्रिया केलेले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकारानंतर एमआयडीसी प्रशासनाने सिडको एन-1 येथे टॅंकर भरण्यासाठी सुविधा महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बुधवारपासून या ठिकाणी टॅंकर भरणे सुरू झाले आहे. सिडको एन-5 व एन-7 येथील पाण्याच्या टाकीवर भरले जाणारे टॅंकर एन-1 येथे पाठविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे; मात्र एन-1 येथील एमआयडीसीच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. टॅंकर भरताना त्यात केरकचरा येत आहे. तसेच पाण्याची दुर्गंधीही येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून सांगण्यात आले की, वाळूज येथे एमआयडीसीचा जलशुद्धीकरण प्लॅंट आहे. तेथे पाणी शुद्ध झाल्यानंतरच ते चिकलठाणा एमआयडीसीकडे पाठविले जाते. तसेच महापालिकेचे टॅंकर भरण्यापूर्वीच या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी केली आहे.

Web Title: MIDC water is unclean Citizens Complaint