ज्वारी पिकावर लष्करी अळ्यांचा अटॅक

अविनाश काळे
Sunday, 13 December 2020

अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्याला विलंब झाला, ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपत आल्याने अनेक शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी केली.

उमरगा (जिल्हा  उस्मानाबाद): अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पेरण्याला विलंब झाला, ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपत आल्याने अनेक शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी केली. अगोदरच ज्वारीचे पेरणी क्षेत्र कमी झालेले असताना ऐन वाढीच्या स्थितीत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या ज्वारीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रात खरीप हंगामातील पिके घेतली जातात. यंदाच्या जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याला गती दिली. त्यामुळे ओलाव्यामुळे पिके बहरात आली असताना अचानक पावसाचा एक महिन्याचा खंड पडला. परिणामी उत्पन्नात कमालीची घट झाली.

भाऊबंदकीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. राशी करण्यासाठी उशीर झाल्याने रब्बी पेरणीही उशीरा सुरू झाल्या. पिकांची वाढ झाल्याचे चित्र दिसत असले तरी अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे खरिपातील तूरीवर अळ्यानी प्रहार केला. आता ज्वारी पिकावर लष्करी आळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. दरम्यान अतिवृष्टीने यंदा जमिनीची प्रत खालावली आहे. कोरडवाहु जमिनीतील रब्बीच्या पिकाच्या वाढीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून हरभरा, ज्वारी, गहू पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध पाणी देण्याचे काम सुरू केले आहे.

परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर

अळ्यांच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन-
यंदा पेरणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. ज्वारीचे क्षेत्र साधारणतः बारा हेक्टर आहे. मंध्यतरीच्या ढगाळ वातावरणामुळे अळ्याचे प्रमाण वाढत आहे. कृषी विभागाने पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान पिकावरील अळ्याची सुरुवात, त्याचे प्रमाणाचे निरीक्षण करण्यासाठी व त्यानंतर कराव्या लागणाऱ्या  उपाययोजनासाठी कृषी विभाग कामगंध सापळ्याचे नियोजन केले आहे.

" यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी आहे त्यात लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी पोंग्यात असल्याने शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. पानावर लहान चट्टे दिसू लागले की अळीने प्रहार केल्याचे समजावे, कालांतराने पाने फाटून जातात परिणामी उत्पन्नावर परिणाम होतो. याची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी सहाय्यकामार्फत मार्गदर्शन सुरू असून योग्य औषध फवारणीचा सल्ला दिला जात आहे. हरभरा व ज्वारी पिकावरील अळ्यांसाठी कामगंध सापळा प्रकल्प राबवला जात आहे.
  - सुनील जाधव, तालुका कृषी अधिकारी.

 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Military larvae hit on sorghum crop decrease in tide yield