लाखोंच्या नोटा परस्पर दिल्या बदलून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

माझ्याकडे बॅंकेच्या विविध कर्ज व इतर योजनांची माहिती असते. या घडलेल्या प्रकाराबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. तो मला अधिकार नाही. तुम्ही आमच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातील प्रवक्‍त्याशी संपर्क साधावा.
- महेश बन्सवाणी, सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, क्षेत्रिय कार्यालय.

उदगीरमध्ये महाबॅंकेचे चौघे निलंबित; माहिती देण्यास टाळाटाळ
लातूर - उदगीर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये लाखोंच्या नोटा परस्पर बदलून दिल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने बॅंकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या संदर्भात माहिती देण्यास बॅंकेने टाळाटाळ केली.

पत्रकारांनाही उडवाउडवीची उत्तरे देऊन या घटनेवर एक प्रकारे पांघरूण घालण्याचाच बॅंकेचे अधिकारी प्रयत्न करीत असताना दिसून येत होते. सध्या उदगीर येथे पालिकेची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नेमकी किती व कोणाला पैसे बदलून दिले, हे मात्र सध्या तरी गुलदस्तात आहे. दरम्यान, या प्रकाराचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बॅंकेकडून मागवला आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याचा परिणाम सर्वच घटकावर झाला आहे. सध्या बॅंकेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. यासाठी सर्व माहिती बॅंक कर्मचारी ग्राहकांकडून घेत आहेत. मोठ्या प्रमाणात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा एकाच वेळी दिल्या तर त्याची अधिक चौकशी केली जात आहे. पैशांसाठी बॅंकांत रांगा लागत आहेत. हे माहीत असतानाही उदगीर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एका शाखेत मात्र लाखोंच्या नोटा परस्पर बदलून दिल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

चलनातून बंद झालेल्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा घेऊन संबंधिताला चलनातील नोटा देण्याचा हा प्रकार आहे. हे समोर आल्यानंतर या शाखेतील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी वाऱ्यासारखे जिल्ह्यात पसरले. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा झाली; पण याची माहिती देण्यास बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. या बॅंकेचे क्षेत्रीय कार्यालय येथे आहे. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता मुख्य कार्यालयातील प्रवक्‍त्याशी संपर्क साधावा, अशी उत्तरे देण्यात आली. पुण्यात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. सध्या उदगीरमध्ये पालिकेची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे कोणी तरी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या नोटा बदलून घेतल्याचे समजते.

उदगीर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये परस्पर नोटा बदलून दिल्याचा प्रकार घडला आहे. यात बॅंकेने संबंधितांवर कारवाई केली आहे. चौकशीही सुरू केली आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे.
- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी.

Web Title: Millions of changing the currency had mutually