रामेश्वराच्या यात्रेनिमित्त येणार सौताड्यात लाखो भाविक

रामेश्वराच्या यात्रेनिमित्त येणार सौताड्यात लाखो भाविक
रामेश्वराच्या यात्रेनिमित्त येणार सौताड्यात लाखो भाविक

पाटोदा - निसर्गाची मुक्त उधळण, पाचशे फुटांपेक्षा अधिक उंचीवरून खोल नदीत पडणारा विंचरणा नदीवरील नयनमनोहर धबधबा व वनवास काळात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचा सौताडा (ता. पाटोदा) परिसराला पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे. येथील रामेश्वर या ठिकाणी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी (ता. 22) दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत आहे. यात्रेनिमित्त रामेश्वराचे दर्शन व निसर्गाचा आविष्कार पाहण्यासाठी लाखो भाविक व पर्यटकांची गर्दी होणार आहे. 

 
सौताडा हे बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. निजामकाळात निजामाची चौकी म्हणून गाव ओळखले जात असले, तरी येथील सुप्रसिद्ध धबधबा व दरीतील रामेश्वराचे मंदिर यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. बालाघाट डोंगररांगांत असलेल्या खोल दरीत विंचरणा नदीची धार पडत असून, हा प्रसिद्ध धबधबा पाचशे फुटांपेक्षा अधिक उंचीवरून दरीत कोसळतो. दरीत घनदाट झाडी, विविध प्रकारची वृक्षवेली, हरीण, मोर, वन्यप्राण्यांबरोबरच विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात असलेले रामेश्वराचे सुंदर मंदिर यामुळे नैसर्गिकदृष्ट्या व आध्यात्मिक वारसा असलेले हे ठिकाण भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षी या ठिकाणी शैक्षणिक सहली, भाविक व पर्यटकांची गर्दी असते. विशेषत: श्रावणात सुरू होणारा धबधबा व मोहरणारा निसर्ग यमुळे मोठी गर्दी असते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी होत असली, तरी तिसऱ्या श्रावणी सोमवारी येथे यत्रा भरते. य यात्रेस लाखो पर्यटक व भाविक हजेरी लावतात.

सुविधांचा अभाव
दरवर्षी विशेषत: श्रावण महिन्यात निसर्गाचे खरेखुरे रूप पाहण्यासाठी हौशी पर्यटक व श्रावणातल्या पवित्र वातावरणात रामेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करणारे भाविक यांना या ठिकाणी असुविधांचा सामना करावा लागतो. "रोप वे‘ची सोय नसल्याने वृद्धांना कड्यावरूनच रामेश्वराचे दर्शन घ्यावे लागते. भक्त निवास नसल्याने भाविक व पर्यटकांना जामखेड मुक्कामी थांबावे लागते. या ठिकाणी पोलिस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नागरिकांची मागणी आहे.

मिनी महाबळेश्वर
नागमोडी वळणाचा सौताडा घाट, पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर, धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेला रामेश्वर साठवण तलाव, तर धबधब्याच्या खालच्या बाजूचा भुतवडा तलाव, पूर्वेकडून दरीत पडणारा छोटा धबधबा, तर उत्तरेकडून पडणारा विंचरणा नदीचा प्रसिद्ध धबधबा यामुळे य निसर्गरम्य परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून झाली आहे.

यात्रोत्सवाचे आकर्षण
श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी भरणाऱ्या यात्रोत्सवात रामेश्वराच्या घोड्याची गावातील राममंदिरापासून ते दरीतील रामेश्वराचे मंदिर अशी काढण्यात येणारी मिरवणूक हे गावातील आबालवृद्धांचे आकर्षण असते. यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रकारचे छोटे-मोठे व्यावसायिक या यत्रेत हजेरी लावतात. या यत्रेनिमित्त बीड-पाटोदा-जामखेड व नगर आगाराच्या बस सोडल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com