Vidhan Sabha 2019 : औरंगाबाद : एमआयएमने जाहीर केले शहरातील उमेदवार, यांचा आहे समावेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पूर्वमध्ये डॉ. गफ्फार कादरी यांच्या नावाला काहीजणांनी विरोध केला होता; मात्र पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी ऑडिओ क्‍लिप पाठवून विरोध करणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

विधानसभा 2019
औरंगाबाद -
लोकसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघासाठी अनेक इच्छुक होते. उमेदवारीची माळ गळ्यात पडावी, यासाठी प्रचंड स्पर्धा असताना पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद पूर्वमधून अपेक्षेप्रमाणे डॉ. गफ्फार कादरी, पश्‍चिममधून अरुण बोर्डे; तर मध्यमधून सर्वांना धक्का देत नगरसेवक नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर केली. 

औरंगाबाद मध्य आणि पूर्वमधून कुणाच्या गळ्यात माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पूर्वमध्ये डॉ. गफ्फार कादरी यांच्या नावाला काहीजणांनी विरोध केला होता; मात्र पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी ऑडिओ क्‍लिप पाठवून विरोध करणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमला 92 हजार 347 मते मिळाली होती. मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने पुन्हा एकदा डॉ. कादरी यांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली. तब्बल 30 जण इच्छुक असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून सर्वांना धक्का देत नासेर सिद्दिकी यांनी उमेदवारी मिळविली. महापालिकेत गटनेता म्हणून काम केलेले नासेर सिद्दिकी यांची उमेदवारी अनपेक्षित होती.

इम्तियाज जलील यांनी गेली साडेचार वर्षे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या मतदारसंघासाठी पक्षात मोठी स्पर्धा होती. नासेर सिद्दिकी हे इम्तियाज जलील यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांपैकी एक समजले जातात. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यमध्ये एमआयएमला 99 हजार 450 मते मिळाली होती; तर राखीव असलेल्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM candidate from Aurangabad