यूपी, बिहारमध्ये 'एमआयएम'च्या विस्ताराला ब्रेक

यूपी, बिहारमध्ये 'एमआयएम'च्या विस्ताराला ब्रेक

उत्तर प्रदेशात 36 उमेदवारांना फक्त 0.2 टक्के मते
औरंगाबाद - महाराष्ट्रातील यशानंतर "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (एआयएमआयएम) पक्षाने उत्तर प्रदेशातील मुस्लिम-दलित मतांकडे डोळा ठेवून 36 उमेदवारांना मैदानात उतरविले होते. मात्र त्यांचे चार उमेदवार वगळता इतर 32 उमेदवारांना कोणताही प्रभाव पाडता आला नाही. सर्व 36 उमेदवारांना 2 लाख 5 हजार 232 म्हणजे फक्त 0.2 टक्के मते मिळाली.

बिहार, यूपीमधील अपयशाने महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत एमआयएमच्या यशाला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सोडून एमआयएमला इतर राज्यांत प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील एमआयएमच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्रातही एमआयएमच्या यशाला उतरती कळा लागू शकते, असे कार्यकर्तेच आता खासगीत बोलताना दिसतात.

महाराष्ट्र विधानसभेत औरंगाबाद (मध्य) आणि भायखळा विधानसभा मतदारसंघांत जिंकल्यानंतर एमआयएमने आपला मोर्चा इतर राज्यांतही वळविला होता.

"एमआयएम'ने पक्षाच्या अध्यक्षांनी बिहारमध्ये सुरवातीला 12 उमेदवार देण्याचे ठरविले होते. मात्र ऐनवेळी त्यांना सहाच उमेदवार मिळाले. त्यापैकी त्यांचा एकच उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊ शकला. इतर उमेदवारांना प्रभाव पाडता आला नाही.

त्यानंतर उत्तर प्रदेशातील दलित-मुस्लिम मतांची टक्केवारी बघून असदुद्दीन ओवेसी यांनी यूपीत तळ ठोकून 36 मुस्लिम-दलितबहुल मतदारसंघात उमेदवार उभे केले. यासाठी ओवेसी यांनी मुस्लिमबहुल जिल्ह्यांत अनेक सभा घेतल्या. मात्र त्यांच्या फक्त चार उमेदवारांनाच समाधानकारक मते मिळली. यामध्ये मुरादाबाद जिल्ह्यातील कॅन्ट-सहा या मतदारसंघातील उमेदवार फैजउल्ला चौधरी यांना 22 हजार 908, संभल मतदारसंघातील झिया उर रहेमान यांना 60 हजार 426, फिरोजाबादमधील एहतेशाम अली यांना 11 हजार 478, मेहदावलमधील संत कबीरनगर मतदारसंघात तासिब खान यांना 19 हजार 40 मते मिळाली, तर मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकुरवारा येथील अजीज अन्सारी यांना 9 हजार 444 मते मिळाली. इतर उमेदवारांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मात्र ओवेसींमुळे सपा-बसपाच्या तीन जागा कमी झाल्या. तसेच याचा एकतर्फी फायदा हा भाजप उमेदवारांना झालेला दिसतो. एमआयएमने 36 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील 22 मुस्लिमबहुल जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

महाराष्ट्रात परिणाम?
दिल्ली, उत्तर प्रदेशातील अपयशाचा महाराष्ट्रातील एमआयएमच्या वाटचालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आत्तापर्यंत एमआयएमचा सर्वाधिक फटका हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत एमआयएमला कोणताही प्रभाव टाकता आला नाही. तर दहा महापालिकांमध्ये त्यांना 25 नगरसेवक विजयी करता आले. त्यातही पुणे आणि त्यानंतर लातूरमध्ये गटबाजी उफाळून आली. अगोदर बिहार आणि त्यानंतर यूपीमध्ये हाती भोपळा लागल्याने महाराष्ट्रातील वाटचालीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यातच पक्षाच्या अध्यक्षांनी राज्यातील कोअर कमिटी बरखास्त केली. त्यामुळे येत्या काळात पक्षाचा गड असलेल्या मराठवाड्यातील परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकीत कशी टक्कर द्यावी, असा प्रश्‍न पक्ष कार्यकर्त्यांपुढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com