"एमआयएम'च्या नव्या भूमिकेने शंकेला वाव 

"एमआयएम'च्या नव्या भूमिकेने शंकेला वाव 

बीड - पहिल्यांदाच निवडणुकीच्या फडात उतरलेल्या एमआयएमने शहरात जोरदार कामगिरी केली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाचे नऊ नगरसेवकही निवडून आले; पण आम्ही विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावणार असे सांगणाऱ्या पक्षाची पावले सत्तेकडे वळण्यामागच्या भूमिकेने शंकेला वाव मिळाला आहे. तर पक्षात पडलेल्या उभ्या फुटीमुळे मतदारांतही नाराजी आहे. 

बीड पालिका निवडणुकीत एमआएमच्या तशा कायम दुहेरी भूमिका राहिल्या. त्यांच्यात सुरवातीपासून एकमेकांवर आरोप आणि शंकाही व्यक्त होत होत्या; पण मतदान करताना वेगळ्या अपेक्षांनी समाज पक्षाच्या मागे उभा राहिल्याचे मतमोजणीत दिसून आले. पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख निझाम दुसऱ्या स्थानावर राहिले, तर पक्षाचे नऊ नगरसेवक पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले.

दरम्यान, प्रचार सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनीही पक्षाला सत्तेपेक्षा सामान्यांच्या हक्काची चिंता असून पक्ष कायम समाजाच्या हक्क आणि विकासासाठी लढणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले. तर इम्तियाज जलील यांनीही पत्रकार परिषदेत हीच भूमिका घेत कोणासोबतही युती करणार नसल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर काहीच दिवसांत पक्षात उभी फूट पडली आहे. शेख सुलताना बेगम शेख चांद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यासह शेख जफर सुलताना बशीर, शेख मोहम्मद खालेद, अहमद नफीसा खातून अहमद, मोमीन अझरोद्दीन नैमोद्दीन, रुखिया बेगम बशिरोद्दीन, शेख बिस्मिल्ला पाशामिया या नऊपैकी सात नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची निवडणूक विभागाकडे नोंदणी केली आहे. या गटाचा ओढा आघाडीकडे असून एमआयएममुळे आघाडीला उपनगराध्यक्षपद मिळणार आहे. सत्तेत कोणासोबतही जाणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावू, असे वरिष्ठ नेते सांगत असताना फूट पाडून वेगळ्या गटाच्या नोंदणीमागे नेमके काय दडले आहे, असा प्रश्‍न मतदारांना सतावत आहे. वेगळा गट आणि वेगळी भूमिका घेण्यामागे काही तरी शिजत असल्याचा संशयही यातून बळावत आहे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा पायदळी तुडवत पक्षाच्या तत्त्वाला तिलांजली देण्याचा प्रयत्नामागे काही तरी "साध्य' असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com