समविचारी पक्षाशी आघाडीची तयारी - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नांदेड - राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना त्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीतही तरुणांना संधी दिली जाणार असल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता. 16) येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. मुंडे यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार; तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची तयारी ठेवून स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय व्हावा. स्थानिक नेतृत्वाला वाटत असेल तर आघाडी होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

ही निवडणूक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. घराणेशाहीचा काही संबंध नाही. जो सक्षम आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर माहितीही घेण्यात आली आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत तरुणांना संधी देण्यात आली होती. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकीमध्ये अंमलबजावणीची राष्ट्रवादीची भूमिका आहे. नोटाबंदीचा परिणाम सर्वांवरच झाला आहे. त्यामुळे तो साहजिकच सर्व इच्छुक उमेदवारांवरही होणार असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते गंगाधरराव कुंटूरकर, आमदार प्रदीप नाईक, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, महानगराध्यक्ष डॉ. सुनील कदम, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, हरिहरराव भोसीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारकडून भ्रमनिरास
देशात मध्यंतरीच्या काळात मोदी लाट नव्हती तर ती परिवर्तनाची लाट होती. देशातील जनतेला परिवर्तन हवे होते. त्याच्या अचूक टायमिंगचा फायदा भाजपने घेतला आणि जनतेच्या परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होत मोदी निवडणूक जिंकले. आता जनतेचा मोदी सरकारकडून भ्रमनिरास झाला असून, जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे जनतेच्या या नाराजीचा फायदा आपण राष्ट्रवादीच्या रूपातून सक्षम पर्याय म्हणून दिला पाहिजे. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

Web Title: Like-minded leading party preparations