पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री निलंग्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

निलंगा : नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकमेव उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर रविवारी निलंग्यात आले होते. मुख्यमंत्री शहरात असूनही त्यांच्या सोबत न जाता रासपच्या उमेदवाराची भेट घेऊन जानकर निघून गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

निलंगा : नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकमेव उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर रविवारी निलंग्यात आले होते. मुख्यमंत्री शहरात असूनही त्यांच्या सोबत न जाता रासपच्या उमेदवाराची भेट घेऊन जानकर निघून गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राज्याच्या सत्तेतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी श्री. जानकर यांच्यावर निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे. हे प्रकरण ताजे असताना जानकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निलंगा नगरपालिका निवडणुकीत शहराच्या प्रभाग क्रमांक पाचमधून रासपचे एकमेव उमेदवार महेश लांढे हे निवडणूक लढवत आहे. या उमेदवाराच्या प्रचार व भेटीसाठी जानकर हे रविवारी निलंग्यात आले होते.

अधिकाऱ्यांची भागमभाग
योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी एक वाजता शहरात आले होते. जानकर हे देखील मुख्यमंत्र्यांसोबतच आले असावे असा अधिकाऱ्यांचा समज झाला. त्यामुळे मंत्र्यांचा ताफा सभेच्या ठिकाणी निघाला तेव्हा अधिकाऱ्यांच्या गाड्याही निघाल्या. काही अंतरावर गेल्यानंतर महादेव जानकर यांची गाडी मागे नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला. मंत्र्यांची गाडी कुठे गायब झाली याचा मग शोध सुरु झाला. तेव्हा जानकर हे पक्षाच्या एकमेव उमेदवाराच्या भेटीसाठी त्याच्या शिवाजी चौकातील घरी गेल्याचे त्यांना कळाले. मग हा एकमेव उमेदवार राहतो कुठे यासाठी अधिकाऱ्यांची भागमभाग सुरू झाली. अखेर महत प्रयत्नानंतर पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या गाड्यांना मार्ग दाखवला. गल्लीबोळातून फिरल्यानंतर मंत्र्यांची गाडी दिसली आणि अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

सभेऐवजी शुभेच्छा
रासपच्या एकमेव उमेदवार महेश लांढे यांच्या प्रचारासाठी जानकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जानकर थेट उमेदवाराच्या घरी गेले. सभेसाठी लोकच आले नसल्याचे समजल्याने त्यांनी उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि ते माघारी फिरले. पण त्यांच्या या भेटीची चर्चा मात्र शहरात दिवसभर सुरू होती.
 

Web Title: minister to campaign for a single candidate