विधानसभा निवडणूकीतही युतीला स्पष्ट बहूमत मिळेल : दिलीप कांबळे

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 28 मे 2019

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकी प्रमाणेच प्रचाराची रणनीती आखली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये युती कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये सुमारे 225 विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मोठी आघाडी मिळाली आहे.

हिंगोली : राज्यात लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही  युतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी ( ता.२७) सकाळशी बोलताना व्यक्त केला आहे.

पालकमंत्री श्री.कांबळे यांनी आज हिंगोलीमध्ये दुष्काळी आढावा बैठक घेतली. त्यानंतर सकाळशी बोलताना ते म्हणाले की, मागील दोन वर्षापासून युतीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होती. प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये बुथ निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन  प्रचाराचे नियोजन करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी युतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. केंद्र व राज्य सरकारने देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच युतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार व जनतेने दाखवलेल्या विश्वासावरच लोकसभेत पुन्हा एकदा  स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकी प्रमाणेच प्रचाराची रणनीती आखली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये युती कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये सुमारे 225 विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मोठी आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणूकीत आघाडी व वंचित आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त मतदान युतीच्या उमेदवारांना मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरचा फार काही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फारसे काही बदल होतील असे वाटत नसल्याचे कांबळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister Dilip Kamble predicts about assembly election