प्रत्येक मंत्र्याचा गैरव्यवहार - मेनन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

आपचे महिला सुरक्षा अभियान
महिला सुरक्षेच्या प्रश्‍नावर पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. ११) राज्यातील सगळ्या पोलिस ठाण्यांत निवेदन देण्यात येणार आहे. महिला अत्याचाराची घटना घडताच महिलेच्या मदतीसाठी स्वतंत्र वकील दिला पाहिजे. हा वकील महिलेला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत मदत करेल, अशी भूमिका असल्याची माहिती ब्रिगेडियर सावंत यांनी मांडली.

औरंगाबाद - आम आदमी पार्टीने  महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले. पण तासाभरात त्यांना क्‍लीन चिट देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्याचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी औरंगाबादेत केला. 

महात्मा जोतिराव फुले शिक्षण परिषदेच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरणासाठी प्रीती मेनन शहरात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रमुख ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचीही उपस्थिती होती. 

मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना बाजार समितीमध्ये केलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कंपनीला ५१ कोटी रुपयांची बॅंकांकडून मिळालेली कर्जमाफी, तसेच मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटाचे काम तीन ठेकेदारांना देण्याचे प्रकरणही आम्ही उघड केले. 

सर्वच प्रकरणांत आम्ही पुराव्यांसह तक्रारी दिल्या. पण फडणवीस सरकारने त्यांना क्‍लीन चिट देऊन टाकल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केला. 

महाराष्ट्र पोलिस स्लीप मोडमध्ये!
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून गृह खाते सांभाळायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा होता; पण आज राज्यातील पोलिस यंत्रणा स्लीप मोडमध्ये आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसतात, हे गंभीर आहे, असा आरोप त्यांनी केला. 

Web Title: minister Non behavioral priti menon sharma