अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी

Aurangabad Court
Aurangabad Court

औरंगाबाद : पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीच्या घरात जाऊन तिला घरातून उचलून नेत अत्याचार केल्याप्रकरणी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली. अय्युब मोहंमद पटेल असे आरोपीचे नाव आहे. 


सिल्लोड तालुक्‍यातील अल्पवयीन मुलगी 14 नोव्हेंबर 2015 रोजी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील शेतात गेले होते. दरम्यान, अय्युब मोहंमद पटेल (वय 33, ता. सिल्लोड) हा पाणी पिण्याच्या बहाण्याने आला. पाणी पिल्यानंतर तो सरळ घरात शिरला आणि त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार केल्याने तिचे तोंड दाबून अय्युबने तिला कडेवर उचलून त्याच्या घरात नेले. तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करून तो पळून गेला. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अय्युब पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तपास करून अय्युब पटेल यास अटक केली. याप्रकरणी तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिचे आई, वडील आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा, कलम बारानुसार एक वर्ष सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ऍड. बागूल यांना तपास अधिकारी मिलिंद खोपडे, व्ही. एस. सोनवणे, पैरवी अधिकारी व्ही. एस. यमपुरे, आर. सी. आगे, एस. बी. वाघ यांनी साहाय्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com