काकासाहेबांचा पुतळा पाहताच आई मिराबाईंनी फोडला हंबरडा

अतुल पाटील
मंगळवार, 23 जुलै 2019

- मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावरील पुतळा पाहताच, आई मीराबाई शिंदे यांनी हंबरडा फोडला.

- पहिल्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी (ता. २३) सकाळी काकासाहेबांचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावरील पुतळा पाहताच, आई मीराबाई शिंदे यांनी हंबरडा फोडला. पहिल्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी (ता. २३) सकाळी काकासाहेबांचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

काकासाहेब शिंदे यांनी २३ जुलै २०१८ ला गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेस आज एक वर्ष पुर्ण झाले. त्यामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने आले होते. यात वडील दत्तात्रय शिंदे, आई मीराबाई शिंदे, भाऊ अविनाश शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची उपस्थिती होती. 'काकासाहेब शिंदे अमर रहे', 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या.

जि.प.च्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडून पाच लाखांची मदत..
काकासाहेबांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेने जाहीर केलेली दहा लाख रुपयांची मदत लालफितीत अडकल्याचे सांगून अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जमा केलेले पाच लाख रुपये यावेळी कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले. 

हुतात्म्यांना शौर्य प्रमाणपत्र..
जुने कायगाव येथे दुपारी शिवशाहीर जाधव यांनी शौर्याचे पोवाडे गायले. यानंतर राज्य समन्वयकांच्याहस्ते हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे, उमेश एंडाईत, केशव चौधरी, जगन्नाथ सोनवणे, कारभारी शेळके, प्रमोद होरे, किशोर हारदे, प्रदीप म्हस्के
यांच्या कुटुंबातील सदस्यांना शौर्य प्रमाणपण देण्यात आले.

रक्तदान, वृक्षारोपण, किर्तन...
जुने कायगाव येथील रामेश्वर मंदिरात ३०० हुन अधिक जणांनी शिबिरात रक्तदान केले. तसेच मंदीर परिसरात २५० झाडे लावण्यात आली. स्मृती दिनानिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सायंकाळी चार वाजता किर्तन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mirabai cries the moment she explores sons statue