हरवलेल्या व्यक्तीची 20 वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट

मनोज साखरे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

गरीब परिस्थितीमुळे कुटुंबीयांनी आधी नाकारले, समुपदेशनानंतर स्वीकारले 

औरंगाबाद - वीस वर्षांपूर्वी ते अचानक बेपत्ता झाले अन्‌ मुंबईत पोचले. डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे ते भोळसरसारखे वागत होते. मुंबईतील एका सेवाभावी संस्थेला ते दिसले आणि त्यांनी त्यांच्यावर सलग 14 वर्षे उपचार केले. हळूहळू त्यांना भूतकाळ आठवू लागला. आपण औरंगाबादचे असल्याचे त्यांनी संस्थेला सांगितल्यानंतर संस्थेने पुंडलिकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी छायाचित्राद्वारे कुटुंबीयांचा शोध घेतला अन्‌ तब्बल वीस वर्षांनंतर ते कुटुंबाला पुन्हा भेटले; परंतु सुरवातीला गरिबी परिस्थितीमुळे कुटुंबीय त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेर समुपदेशनानंतर कुटुंबानेही त्यांना आपलेसे केले. 

एखाद्या चित्रपटाला कथानक शोभावे अशीच ही कहाणी. अशोक मारोती डोंगरे (वय 44, रा. विशालनगर, कडा कार्यालयाजवळ) जेमतेम चोवीस वर्षांचे असतील तेव्हा मुलं, सावत्र आई व पत्नीपासून दुरावले गेले. बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; पण न सापडल्याने त्यांनीही आशा सोडली. अशोक डोंगरे मुंबईत कसे पोचले हे त्यांनाही आठवत नाही. त्यावेळी त्यांच्या डोक्‍याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ते भूतकाळही विसरले होते. सुरवातीची पाच-सहा वर्षे मुंबईत भटकत असतानाच पवईच्या आयआयटीजवळील फुटपाथवर ते साकीनाका येथील करुणा सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी त्यांची शुश्रूषा केली, सलग 14 वर्षे त्यांच्यावर संस्थेमार्फत डॉ. प्रशांत शहा यांनी मोफत उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर डोंगरे यांनी एका हॉटेलात कामाला सुरवात केली. तिथे त्यांना भोजन व साडेतीन हजार रुपये पगार मिळत होता. 

अहो...मी तर औरंगाबादचा! 
आपण औरंगाबादचे आहोत, गजानन महाराज मंदिराजवळ आपण राहत होतो, असा भूतकाळ श्री. डोंगरे यांना आठवू लागला. हे त्यांनी करुणा सेवा फाउंडेशनला सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांना श्री. डोंगरे यांचे एक छायाचित्र पाठविले. यावरून डोंगरेंच्या कुटुंबीयांचा 26 ऑगस्टला पोलिस मित्रांच्या ग्रुपद्वारे शोध लागला. करुणा सेवा फाउंडेशन आणि पुंडलिकनगर पोलिसांनी डोंगरे व कुटुंबीयांची शुक्रवारी (ता.30) भेट घडवून आणली. 
 
आठ बाय दहाचेच घर... 
पत्नीने शिलाई काम करून मुलांना मोठे केले; परंतु आठ बाय दहाचेच घर, त्यातच सात सदस्य घरात, आता यांना कोठे ठेवणार, तुम्हीच सांभाळ करा, अशी भूमिका सुरवातीला कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली; परंतु पोलिसांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले, त्यानंतर त्यांनीही अशोक डोंगरे यांना स्वीकारले, अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली. 
 
कमावलेला पगार दिला हाती 
अशोक डोंगरे एका हॉटेलमध्ये काम करीत होते, तेथे मिळालेली महिन्याची साडेतीन हजारांची मिळकत त्यांनी कुटुंबीयांना देऊ केली. सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम कुटुंबीयांना सोपविण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing Man Found in Mumbai