जालन्याचा लक्ष्मण सापडला, पण नागपूरला 'लिव्ह इन'मध्ये

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना - मुले, पत्नी, नातेवाईक असतानाही अनाथ असल्याचे भासवून दोन वर्षांपासून एका युवतीसह नागपुरात "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये रमलेल्या लक्ष्मणाला जालना पोलिसांनी हुडकून काढले. विशेष म्हणजे त्याने नाव बदलून या युवतीसोबत करारही केलेला होता. 

जालना शहरातील मोदीखाना येथील लक्ष्मण अवधूत हा वर्ष 2017 मध्ये हरवल्याची तक्रार सदरबाजार पोलिस ठाण्यात त्याच्या पत्नीने दिली होती. मात्र त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर हे प्रकरणही बाजूला पडले.

लक्ष्मण काही सापडत नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी पुन्हा पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा कर्तव्यतत्पर पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी याबाबत तपास सुरू केला. पोलिसांनी लक्ष्मणकडील तेव्हाच्या मोबाईल नंबरची माहिती संकलित केली. त्यावेळी त्याच्या एका मित्राचा नंबर मिळाला.

त्याच्याकडे विचारपूस केली असता शहरातील एका नेत्र रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका युवतीसोबत लक्ष्मण याचे सूत जुळल्याचे समोर आले. पोलिसांनी मग त्यादृष्टीने तपास केला असता, लक्ष्मण याने "विश्‍वास सटवाजी यादव' असे खोटे नाव धारण करीत नागपूर गाठत त्या युवतीसोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणे सुरू केले.

लिव्ह इनबाबत करार
विशेष म्हणजे त्याने लिव्ह इनबाबत करार केल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्या युवतीशी संपर्क केला व सर्व कहाणी सांगितली. त्यामुळे युवतीने लिव्ह इन रिलेशनशिप करार रद्द करून लक्ष्मण याला परत जाण्याचा सल्ला दिला. लक्ष्मण अवधूत ऊर्फ विश्‍वास यादव याने पुन्हा पत्नीसोबत संसार करण्याची ग्वाही सदरबाजार पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. 
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख, कर्मचारी परशुराम पवार, अंबादास दांडगे, महिला पोलिस जया नागरे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com