लातूरमधील `एमआयटी`चे 22 कर्मचारी विलीगीकरण कक्षात, खबरदारीचा उपाय

Latur Corona News
Latur Corona News

लातूर : येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात काही काळासाठी कोरोनाबाधित रूग्‍णाच्‍या सहवासात आलेल्‍या सर्व संबंधित २२ कर्मचाऱ्यांना विलगीकरण करून स्‍वतंत्रपणे ठेवण्‍यात आले आहे. सदरील रूग्‍ण नाक, कान, घसा या विभागात येऊन गेल्‍याने या विभागाचे निर्जुंतीककरण करून पूर्ववत सुरू करण्‍यात आला असल्‍याची माहिती एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.पी.जमादार यांनी दिली.


येथील एमआयटीच्‍या यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयाने सुरवातीपासूनच कोरोना या संसर्ग आजाराबाबत दक्षता घेवून योग्‍य ती काळजी घेतली. मात्र गेल्‍या ता.२० मे रोजी या रूग्‍णालयातील नाक, कान, घसा विभागात एका रूग्‍णाची नाकाच्‍या आजाराबाबत तपासणी करण्‍यात आली होती. त्‍यानुसार शस्‍त्रक्रिया करण्‍याचे निश्चित झाले होते. मात्र सदरील रूग्‍णास ताप आणि खोकला होता त्‍याचबरोबर कोविडसारखी लक्षणे दिसून आली. त्‍यामुळे सदरच्‍या रूग्‍णाची शस्‍त्रक्रिया न करता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्याला पाठविण्यात आले. तेथे या रुग्‍णाची तपासणी केली असता तो कोरोनाबाधीत असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात सदरील रूग्‍ण काही काळासाठी आल्‍याने लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आमदार रमेश कराड यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर रूग्‍णाच्‍या संपर्कात आलेले सर्व संबंधीत डॉक्‍टर्स, नर्स व इतर कर्मचारी अशा एकूण २२ जणांना विलगीकरण करून स्‍वतंत्रपणे वेगळे ठेवण्‍यात आले आहे. या सर्वांची औषध उपचारासह राहण्‍याची, जेवणाची वेगळी सोय करण्‍यात आली आहे अशी माहिती डॉ. जमादार यांनी दिली. कोरोना रूग्‍ण आढळून आल्‍याने यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयातील नाक, कान, घसा हा विभाग बंद करण्‍यात आला असल्‍याची अफवा पसरली आहे. मात्र सदरील माहिती खोटी असून नाक, कान, घसा हा आरोग्‍य तपासणी विभाग नियमाप्रमाणे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून पूर्ववत सुरू करण्‍यात आला आहे, असे डॉ.जमादार यांनी सांगितले.

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.संजय ढगे, जिल्‍हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरीदास, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ.अशोक सारडा यांच्‍यासह वि‍वेकानंद पोलिस ठाण्‍याचे पोलीस अधिकारी व्‍ही.एम.सोनवणे यांना याबाबतीची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली असून यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयाच्‍या संपूर्ण परिसरात योग्‍य ती काळजी घेवून उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती डॉ. जमादार यांनी दिली.

स्‍वतंत्र तपासणी कक्ष
यशवंतराव चव्‍हाण ग्रामीण रूग्‍णालयात येणाऱ्या रूग्‍णासाठी ताप, खोकला आणि सर्दी या आजाराची तपासणी करण्‍यासाठी नेताजी सुभाषचंद्र सभागृहात स्‍वतंत्रपणे तपासणी केंद्र सोमवारपासून (ता. २५) सुरू करण्‍यात येत आहे, अशी माहिती डॉ. जमादार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com