स्थानिक कारागिरांमध्ये मिसळा, नव्या कलाकृती जगापुढे आणा

Mix local artisans bring new artwork around the world
Mix local artisans bring new artwork around the world

औरंगाबाद : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन्स जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही विचार केल्यास यशस्वी डिझायनर बनता येईल, असा मंत्र अंजली लोव्हेकर यांनी दिला.

'सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे 'यिन फेस्ट'ची सुरवात झाली असून, यात शनिवारी डिझाईन क्षेत्राविषयी 'यिन टॉक'द्वारे तरुणाईशी संवाद साधण्यात आला. संयुक्‍त प्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पुणे आणि सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. 8) जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला डिझायनिंग आणि आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे माजी विद्यार्थी आणि देशातील आघाडीचे प्रयोगशील क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल, आणि मुंबईच्या इंटेरिअर डिझायनर अंजली लोव्हेकर यांनी 'डिझाइन क्षेत्रातील संधी आणि त्यातील बदलते प्रवाह' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांच्या प्रश्नांनाही दोघांनी मनमोकळी उत्तरे देत शंकासमाधान केले. यावेळी जेएनईसीचे प्राचार्य एस. एच. शिंदे, 'सकाळ'चे युनिट हेड रमेश बोडके, एमजीएम खादी सेंटरच्या संचालक शुभा महाजन आणि प्राध्यापक उपस्थित होते.

कारागिरांच्या कलेचे रक्षण होणे आवश्‍यक

भारतात अनेक ठिकाणी हस्तकला, शिल्पकलेचे अद्भुत ज्ञान असलेले कारागीर आहेत. त्यांच्यातील कला जगात एकमेव अद्वितीय आहेत. सरकार त्यांना सवलती, सबसिडी देते, पण त्यांच्या कलेचे रक्षण करणे आवश्‍यक आहे, असे मत जयपूर येथील प्रसिद्ध फर्निचर डिझाइनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. जयपूर, झुंजनू, गीजगढ, सुलताना, रोहिडा या भागातल्या कलाकारांवर आणि त्यांच्या डिझाईनवर काही प्रयोग केले. पारंपरिक डिझाईनसह काही नव्या गरजेच्या वस्तू बनवून घेतल्या, त्यांना जगाच्या बाजारपेठेत चांगली मागणी आली. त्यामुळे कारागिरांनाही चांगला मोबदला मिळाला, हे सांगतानाच पैशाचे योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेत योग्य विपणन झाल्यास आपल्याकडील कलागुणांना चांगले दिवस येतील. याचा आधुनिक डिझाईनर्सनी फायदा करून घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. आपल्या जयपूर, आफ्रिका, इंदूर आणि एनआयडीतील अनुभवही विद्यार्थ्यांना कथन केले.  

कल्पकता वाचवते पैसा

चांगले डिझाइन्स बनवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, असे अजिबात नाही. थोडी कल्पकता चांगले डिझाईन बनवू शकते. कमी खर्चातही आकर्षक रचना बनवण्याची कला आत्मसात करा, असा मोलाचा सल्ला प्रख्यात डिझाईनर अंजली लोव्हेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपलब्ध जागेत रंगसंगती, सुटसुटीतपणा आणि खर्चाचा ताळमेळ घालून केलेली रचना ग्राहकाला समाधान देणारी असायला हवी. आपल्या व्यस्त दिनचर्येत घरी आल्यावर व्यक्तीला शांत, रिलॅक्‍स वाटलं पाहिजे. तसं झालं तर तुम्ही शिकलेल्या कलेचं चीज झालं असं समजा, असा मंत्र त्यांनी उदयोन्मुख डिझाईनर्सना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com