
Jalna News : जालन्याच्या मेडिकल कॉलेजसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांचा संघर्ष
जालना : जालना शहरात मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात एक रुपयांचाही निधी दिला नाही. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या निधीसाठी व राज्य शासनाच्या भूमिकेचा निषेध करत आमदार कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी (ता.१३) विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले.
त्यामुळे जालन्याला मेडिकल कॉलेजसाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जालना येथे मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी आमदार कैलास गोरंट्याल मागील तीन वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.
त्यांच्या प्रयत्नामुळे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे येऊन मेडिकल कॉलेजसाठी जागेची पाहणी ही केली होती. त्यानंतर वैद्यकीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक देखील जालन्यात आले होते.
या पथकाने जालन्यातील प्रस्तावित महाविद्यालयासाठी काही जागांची पाहणी करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास तातडीने आर्थिक तरतूद करण्याची मागणी आमदार श्री. गोरंट्याल यांनी केली होती.
त्यानुसार ता. २८ फेब्रुवारी रोजी शंभर खाटांच्या जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी खर्च, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने व विद्यार्थी वसतिगृह बांधकामाच्या खर्चाचे अंदाज पत्रकासह आवश्यक पद भरती व खर्चाच्या मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात जालना वगळून उर्वरित दहा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. त्यामुळे जालन्याच्या मेडिकल कॉलेजचे भिजते घोंगडे राज्य शासनाने कायम ठेवले होते. त्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जालना मेडिकल कॉलेजसाठी तत्काळ निधी द्यावा, या मागणीसह राज्य शासनाने कॉलेज संदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात सोमवारी (ता.१३) आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
जोपर्यंत जालना मेडिकल कॉलेजसाठी निधी मिळणार नाही, तोपर्यंत विविध आंदोलन केले जाणार असल्याचे आमदार श्री. गोरंट्याल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी आमदार राजेश राठोड, आमदार सतीश चव्हाण यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
महाविकास आघाडीच्या आमदारांचा पाठिंबा
जालना येथील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास तत्काळ निधी द्यावा, या मागणीसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या आंदोलनास महाविकास आघाडीच्या विविध आमदारांनीही पाठिंबा दिला आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, आमदार छगन भुजबळ, आमदार अबू आझमी, आमदार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी श्री.गोरंट्याल यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
जालना मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाही. जालना मेडिकल कॉलेजसाठी तत्काळ निधीची तरतूद करावी या मागणीसह जालन्यासंदर्भातील राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले आहे. जोपर्यंत जालना मेडिकल कॉलेजसाठी निधी मिळत नाही, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने यापुढे आंदोलन केले जाणार आहे.
— कैलास गोरंट्याल, आमदार, जालना