पिककर्ज वसुलीच्या नोटीस दिल्यास महागात पडेल : आ. संतोष बांगर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविल्यास महागात पडेल अशा शब्दात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बँकांना ठणकावले आहे. तर शेतकऱ्यांनी  नोटीस मिळाल्यास त्याची होळी करावी असे आवाहन त्यांनी केले. 

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविल्यास महागात पडेल अशा शब्दात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बँकांना ठणकावले आहे. तर शेतकऱ्यांनी  नोटीस मिळाल्यास त्याची होळी करावी असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उशीराने झालेल्या पावसामुळे मुग, उडीदाचे नुकसान झाले. त्यानंतर सोयाबिनचा हाती आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. सोयाबिनच्या पिकाला कोंबे फुटली आहेत. तर कापसाची पहिली वेचणीही झाली नाही. पहिल्या वेचणीचा कापूस पावसाने धुवून गेला तर उर्वरीत बोंडे सडून गेली आहे. तुरीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

या परिस्थितीत आता बँकांककडून पिककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावल्या जात आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस देखील पाठविल्याच्या तक्रारी आहेत. या बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे आमदार बांगर चांगलेच संतापले. शेतकऱ्यांना नोटीस पाठवाल तर महागात पडेल अशा शब्दात त्यांनी बँकांना ठणकावले आहे. तर शेतकऱ्यांनीही त्यांना देण्यात आलेल्या नोटीसांची होळी करावी असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हयात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. त्यातच बँकांकडून नोटीस देऊन शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. मात्र आता यापुढे एकाही बँकेने नोटीस दिल्यास त्यांना चांगलेच महागात पडणार असून बँकेसमोर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही आमदार बांगर यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Santosh Bangar gets angry on banks at Hingoli