कमवा शिका मध्ये मुलींना जनावरांसारखे राबवताहेत : आमदार सतीश चव्हाण 

कमवा शिका मध्ये मुलींना जनावरांसारखे राबवताहेत : आमदार सतीश चव्हाण 

औरंगाबाद : 'कमवा आणि शिका' योजनेमध्ये मुलींना जनावरांसारखे राबवून घेतले जात आहे. सकाळी दहा वाजता परीक्षा असली, तरी नऊपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलींना हातात खुरपे घ्यावे लागते. हे निंदनीय असून कौशल्यावर आधारित काम मुलींना द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी (ता. 29) प्र-कुलगुरुंकडे केली. 

प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांच्या भेटीनंतर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चार दिवसांपासून अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची टाकी दीड वर्षे धुतलेली नाही. मुलींच्या वसतिगृहात मेसच नाही. आरोग्य अधिकारी नाहीत, अशा अडचणी मुलींनी सांगितल्या. पाहणीनंतर चव्हाण यांनी ओपन स्टडी सेंटर सुसज्ज बनविणे, वसतिगृहांमध्ये मेस, स्वतंत्र विद्यार्थिनी कक्ष सुरु करावा, पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, महिला आरोग्य अधिकारी नेमाव्यात, 'कमवा आणि शिका' योजनेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन, कागदी पिशव्या, फाईल बनविणे, रोपे तयार करण्याची कामे द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. पत्रकार परिषदेला मयूर सोनवणे, अक्षय पाटील, अमोल दांडगे, दीक्षा पवार यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. 

- शैक्षणिक शुल्क माफ करावे, भोजन भत्ता सुरु करा. 

- दिवाळीनंतरही प्रश्‍न न सुटल्यास कायमस्वरुपी आंदोलन केंद्र. 

- परीक्षेच्या दिवशी कमवा शिकाला सुटी देऊन मानधन द्या. 

नॅकबाबत कुलगुरुंचा कांगावा

विद्यापीठात नॅक येणार म्हणून सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या, कुलगुरु मात्र, निवडक अधिकाऱ्यांना घेऊन परिषदेसाठी विदेशात गेले. नॅक डिसेंबरला येणार म्हणून नुसताच कांगावा होत असून त्यासाठी प्रस्ताव मात्र, परवा रात्री पाठवला आहे. निवृत्त प्राध्यापकांना पेन्शन मिळत असताना पुन्हा विद्यापीठात त्यांना पगारावर पोसले जाते. चौकशी अहवाल दाबले जातात. कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे स्वमर्जीने विद्यापीठ प्रशासन चालवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com