Vidhan Sabha 2019 : भाजप म्हणजे दलालांची पार्टी, आमदार भालेराव यांचा घरचा आहेर

युवराज धोतरे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पोतराजांच्या वेशभूषेत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

विधानसभा 2019 
उदगीर (जि. लातूर) -
''भारतीय जनता पार्टी आता दलालांची पार्टी झाली आहे. यामध्ये निष्ठेला किंमत राहिली नाही. माझ्यासारख्या इमानदार कार्यकर्त्यांची उमेदवारी कापून पक्षाने माझ्यावर घोर अन्याय केला'', असा आरोप आमदार सुधाकर भालेराव यांनी केला.

विधानसभा निवडणुकीसाठी उदगीर मतदार संघातून पोतराजाच्या वेशभूषेत आज (ता. चार) त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार भालेराव यांनी भाजप आणि लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशांचे ऐकून माझी उमेदवारी कापली गेली आहे. दहा वर्षांपासून मी आमदार आहे. मी उदगीर तालुक्याचा विकासासाठी कटिबद्ध आहे. मतदारांच्या आशीर्वादावरच अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, निवडणूक लढवत आहे,'' असे त्यांनी जाहीर केले.

''आता भाजप हा पक्ष अटलजी आणि अडवाणींचा पक्ष राहिला नसून काँग्रेस-राष्ट्रवादी सारखी अवस्था भाजपाची होत आहे. येथे निष्ठावंतांना न्याय नाही आणि दलालांना जास्त किंमत आहे. मी आता जनतेच्या सहकार्यावर निवडणूक लढवणार आहे. मला आता मंत्री करतो म्हटले तरी मी माघार घेणार नाही'', असा निर्धारही त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sudhakar Bhalerao criticized BJP