आमदारांना पगारवाढ, शेतकऱ्यांना नकारघंटा - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

उस्मानाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी नसल्याची नकारघंटा शासन वाजवत आहे. तर आमदारांचा पगार वाढविण्यासंदर्भात एका महिन्यात घोषणा होते व दुसऱ्या महिन्यात लागू होते. यावरून शासनाची मानसिकता तपासणे गरजेचे आहे, अशी टीका अचलपूरचे (जि. अमरावती) अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केली.

उस्मानाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी नसल्याची नकारघंटा शासन वाजवत आहे. तर आमदारांचा पगार वाढविण्यासंदर्भात एका महिन्यात घोषणा होते व दुसऱ्या महिन्यात लागू होते. यावरून शासनाची मानसिकता तपासणे गरजेचे आहे, अशी टीका अचलपूरचे (जि. अमरावती) अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केली.

नागपूरहून निघालेली शेतकऱ्यांची आसूड यात्रा शुक्रवारी (ता. 14) उस्मानाबादेत पोचली. त्या वेळी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार कडू पत्रकारांशी बोलत होते.

बुलेट ट्रेन, सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून लाखो कोटी खर्च केले जातात; पण शेतकऱ्यांसाठी 20 ते 25 हजार कोटी नसल्याची नकारघंटा शासन वाजवत आहे. शहरात घर बांधण्यासाठी जास्त अन्‌ ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी कमी अनुदान दिले जात आहे.

अपंगांना महिना 600 रुपये दिले जात आहेत. तर आमदारांना महिन्याला दीड लाख रुपयांचा पगार दिला जात आहे, हा भेदभावही आमदार कडू यांनी स्पष्ट केला.

तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावे लागतील अन्यथा मंत्र्यांच्या घरात घुसू, असा इशारा आमदार कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या आसूड यात्रेचा 21 एप्रिलला वडनगर (गुजरात) येथे समारोप होणार आहे. एक हजार शेतकरी समारोपाप्रसंगी रक्तदान करणार आहेत. "आमचे रक्त घ्या; पण जीव घेऊ नका' असा संदेश यातून दिला जाणार असल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, कार्याध्यक्ष कालिदास पाटील, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर आदी या वेळी उपस्थित होते.

हेमा मालिनी सिनेमात दारू पितात
अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी सावरासावर केली. हेमा मालिनी भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. चित्रपटांमध्ये त्या दारू पित असल्याचे पाहिल्याने त्यांच्यासंबंधी आपण वक्तव्य केल्याचे ते म्हणाले. दारूमुळे शेतकरी
आत्महत्या करतात, हे म्हणणे चुकीचे असल्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी आमदार कडू गुरुवारी (ता. 13) नांदेडमध्ये म्हणाले होते, की ""75 टक्के आमदार, खासदार आणि अन्य लोक दारू पितात. एवढेच नव्हे, तर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी याही रोज एक बंपर दारू पितात, मग या लोकांनी आत्महत्या का केली नाही.''

Web Title: MLAs salary, farmers oppose