बारावी पास भामटा वापरायचा १५ मोबाईल अन्‌ २७ एटीएम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद - वय जेमतेम तेवीस वर्षे, साधारण परिस्थिती, कामधंदा नाही म्हणून उत्तरप्रदेशातून मुंबई गाठली..चेक क्‍लोनिंग करणाऱ्यांशी गाठ पडली अन्‌ तो यात तरबेज झाला. यातून अमाप पैसा कमवून तो आता विमानप्रवासही करू लागला; पण या हायप्रोफाईल उद्योगाला पोलिसांची खीळ बसली अन्‌ हाती बेड्या पडल्या. 

औरंगाबाद - वय जेमतेम तेवीस वर्षे, साधारण परिस्थिती, कामधंदा नाही म्हणून उत्तरप्रदेशातून मुंबई गाठली..चेक क्‍लोनिंग करणाऱ्यांशी गाठ पडली अन्‌ तो यात तरबेज झाला. यातून अमाप पैसा कमवून तो आता विमानप्रवासही करू लागला; पण या हायप्रोफाईल उद्योगाला पोलिसांची खीळ बसली अन्‌ हाती बेड्या पडल्या. 

मनीषकुमार जयराम मोर्या ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष रामलाल यादव ऊर्फ अमित रमेशसिंग अशा विविध नावाने हा भामटा ओळखला जातो. सिखडी (पो. परगासपूर, जि. भदोनी, उत्तरप्रदेश) येथे तो वास्तव्यास आहे. केवळ बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले. कामधंद्यासाठी मुंबई गाठली. डमी चेक बनवणारांच्या संगतीला लागला अन्‌ पाहता पाहता मास्टरमाइंड बनला.

त्याच्याकडे पोलिसांना पंधरा मोबाईल व २७ एटीएम कार्ड सापडली. प्राथमिक माहितीनुसार, हे मोबाईल तो स्वतः वापरतो. खासकरून सत्तावीस एटीएम कार्डचे पासवर्डही त्याला सहज आठवतात. गरजू व्यक्ती हेरून तो त्या व्यक्तीची कागदपत्रे, आधारकार्ड फसवणुकीसाठी वापरतो. आधारकार्डवरील पत्ते बदलून या कागदपत्रांचे विविध शहरात बॅंकेत खाते उघडतो. एक खात्यासाठी दोन हजार रुपयेही ते व त्याचे सहकारी गरजूंना देत होते, आधारकार्डचा वापर करू देणाऱ्यास पाचशे रुपये तो देत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

  प्रत्येक संशयितांना कामे वाटून दिली होती.
  फसवणुकीसाठी एकमेकांना मदत केली जात होती.
  काही रक्कम चेकद्वारे, तर काही एटीएमद्वारे काढली जात होती.
  दीडवर्षांपासून ही टोळी या ‘उद्योगा’त सक्रिय.

या बॅंकांना फटका
टीजेएसबी, कर्नाटक, आंध्रा, युनियन बॅंकांना भामट्याच्या कृत्यांचा फटका बसला. तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बॅंकांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबादेतच एकाच व्यक्तीची तब्बल १९ खाते असल्याचे संशयितांच्या चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: mobile ATM crime manishkumar mourya