औरंगाबादच्या माजी महापौरांना चावला चोर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

घडमोडे यांनी धाडसाने मोबाईल चोराला पकडले 

औरंगाबाद  - रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला शुक्रवारी (ता. 13) रात्री भाजपचे माजी महापौर भगवान घडमोडे यांनी धाडसाने पकडून दिले. मात्र, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी चोरट्याने त्यांच्या बोटाचा चावा घेतल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात धाव घ्यावी लागली. 

माजी महापौर घडमोडे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सिडको भागातील सारस्वत बॅंकेसमोरून आपल्या कारने जात होते. यावेळी समोर धावपळ सुरू झाली. एकजण "माझा मोबाईल चोरला, त्याला पकडा' असे ओरडत होता. श्री. घडमोडे यांनी हा आवाज ऐकताच कार उभी करून चोरट्याला पकडण्यासाठी धाव घेतली. पाठलाग करून त्यांनी चोरट्याला पकडलेही. मात्र, त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी चोरट्याने त्यांच्या बोटाला जोरात चावा घेतला. याचवेळी इतर नागरिकही श्री. घडमोडे यांच्या मदतीला धावले. त्यांनी चोरट्याला पकडून चोप दिला. त्यानंतर सिडको पोलिसांना बोलावून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, या भुरट्या चोराचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, वेदना होत
असल्यामुळे घडमोडे यांना तत्काळ रुग्णालय गाठावे लागले. 

माझ्या समोरूनच चोरटा पळून जात होता. समोरचा व्यक्ती त्याच्या मागे पळत होता, हे बघून मी कारमधून तातडीने उतरलो. माझ्या बोटाला चोरट्याने चावा घेतला असला तरी
माझ्या तत्परतेमुळे एखद्याचा मोबाईल वाचला, याचे समाधान वाटले. 
- भगवान घडमोडे, माजी महापौर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Thief Arrested