esakal | मुंडेंमुळे महापौरपद भेटणाऱ्या कराडांना मुंडेंऐवजी मंत्रीपद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंडेंमुळे महापौरपद भेटणाऱ्या कराडांना मुंडेंऐवजी मंत्रिपद

मुंडेंमुळे महापौरपद भेटणाऱ्या कराडांना मुंडेंऐवजी मंत्रिपद

sakal_logo
By
दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : दोन वेळा विक्रमी मतांनी विजय, उच्चशिक्षीत आणि सहा अनुभवासोबतच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या असल्याने यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. पण, ज्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे डॉ. भागवत कराड यांना महापौरपदाची संधी मिळायची त्यांनाच आता ‘मुंडेंऐवजी’ केंद्रात संधी मिळाली. यापूर्वीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष त्यांना राज्यसभेची संधी दिली. तर, विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांची उमेदवारी भरण्याची तयारी सुरु असताना ऐनवेळी रमेश कराड यांना संधी दिली गेली. त्यामुळे भाजपची मुंडेंबाबतची भूमिका चक्रावणारी असल्याच जाणकारांच मत आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपला बहुजन चेहरा मिळवून दिला. विशेष म्हणजे तत्कालिन युतीमध्येही औरंगाबाद शहरात शिवसेनेची चालती असायची. शहरातील तीनही मतदार संघ शिवसेनेकडे असायचे. महापालिका निवडणुकीत भाजप लहान भाऊच असे. पण, वाटाघाटीत दिवंगत मुंडे अडीच वर्ष का होईना भाजपच्या पदरात महापौरपद पाडून घेत. त्यातूनच डॉ. कराड यांच्या गळ्यात या पदाची माळ पडली. पण, आता ज्यांच्यामुळे ज्यांना माळ पडायची आता त्यांच्या ऐवजी त्यांच्याच गळ्यात माळ पडण्याने समर्थकांना मोठे कोडे पडले आहे. केवळ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या म्हणूनच नाही तर डॉ. प्रितम मुंडे यांनी आपला राजकीय वकुब देखील सिद्ध केला आहे. दोन वेळा खासदार आणि विशेष म्हणजे मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळविलेला आहे. त्या उच्चशिक्षीतही आहेत. त्यामुळे यंदा त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा आणि विश्वासही होता.

हेही वाचा: ‘टीम मोदी’चा महाविस्तार! पाहा संपूर्ण यादी

परंतु, तिसऱ्यांदा मुंडेंबाबत भाजपने असे धक्कातंत्र वापरले आहे. डॉ. कराड यांची राज्यसभाही पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष फायनल झाली. तर, एकीकडे त्या स्वत: विधानपरिषद निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना त्यांचेच समर्थक रमेश कराड यांच्या गळ्यात ही माळ पडली. मागच्या काळात त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्यापासून त्या पुन्हा ताकदीने संघटन कामात उतरलेल्या असताना आता हा प्रकार घडला आहे. भलेही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी ओबीसी व मास लिडर ही ओळख त्यांनी सिद्ध करुन दाखविलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनीच केले.

loading image