एमआयडीसीच्या नियमांत बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण अवघड आहे. औद्योगिक क्षेत्रावर हल्ला टाळण्यासाठी वाळूजच्या उद्योगांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आणि अजून रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. स्वतःच्या उद्योगांची सुरक्षा चोख करण्यासाठीही त्यांनी पावले टाकायला सुरवात केली आहे. 

औरंगाबाद - रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण अवघड आहे. औद्योगिक क्षेत्रावर हल्ला टाळण्यासाठी वाळूजच्या उद्योगांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आणि अजून रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे. स्वतःच्या उद्योगांची सुरक्षा चोख करण्यासाठीही त्यांनी पावले टाकायला सुरवात केली आहे. 

गेल्या आठवड्यात वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यात सुमारे साठ कोटींचे नुकसान झाले. यापुढे असे हल्ले होऊ नयेत, यासाठी काही खबरदारीचे उपाय उद्योजक आखत आहेत. काही गोष्टींमधील सुधार हा शासकीय पातळीहून व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. रहिवासी क्षेत्राचा भार असलेल्या एमआयडीसी सिडको ठाण्यावर सध्या सुमारे अडीच हजार कंपन्यांच्या सुरक्षेचेही दायित्व आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी होत आहे. 

रस्ते आहेत, त्यांना तयार करा..
वाळूज औद्योगिक वसाहतीसाठी असलेले अप्रोच रोड तयार करण्यासाठी दुर्दैवाने एमआयडीसीकडून अद्याप प्रयत्न झालेले नाहीत. साजापूर, जोगेश्वरी आणि मुंबई महामार्गाला थेट भिडणाऱ्या या औद्योगिक वसाहतीमधील रस्ते एमआयडीसीच्या अखत्यारित आहेत. त्यांचे मजबुतीकरण झाले असले तरी डांबराचा हात अद्याप लागलेला नाही. हे रस्ते तयार करून वाळूज वासाहतीचा श्‍वास मोकळा करावा, अशी मागणी आता पुढे आली आहे. 

बहुराष्ट्रीय कंपन्यांवरही हल्ला झाला. त्यामुळे परदेशात नकारात्मक माहिती गेली. या मोठ्या उद्योगांनी येथून जाऊ नये आणि सावरू पाहणाऱ्या लहान उद्योगांना धीर देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिनिधींनी येऊन त्वरित चर्चा करायला हवी. 
-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ

वाळूज औद्योगिक वसाहतीची सुरक्षा यापुढे चांगली राहावी, यासाठी उद्योगांनी आपल्या सुरक्षा यंत्रणेची बळकटी करणे गरजेचे आहे. येथील उद्योगांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या उद्योगांनीच स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा वर्गणीतून उभी केली तर असे प्रकार टाळता येतील. 
-वसंत वाघमारे, अध्यक्ष, वाळूज औद्योगिक संघटना

उद्योगांनाच आपली सुरक्षा करता यावी, यासाठी भिंतींची उंची वाढवयला परवानगी द्यावी. या वसाहतीला अन्य अप्रोच रोड एमआयडीसीने तयार करून द्यावेत. रहिवासी क्षेत्राचा भार वाहणाऱ्या पोलिस ठाण्याकडून सुरक्षेची अपेक्षा न करता उद्योगांची संख्या पाहता वाळूजमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र ठाणे मिळावे. 
-गजानन देशमुख, सचिव, मसिआ

Web Title: Modification of MIDC rules