मोह्यात सावकाराच्या घरावर छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

संशयास्पद कागदपत्रे, रजिस्ट्री, पासबुक जप्त

कळंब - विनापरवाना सावकारी करून सर्वसामान्यांना छळणाऱ्या तालुक्‍यातील मोहा येथील खासगी सावकार पप्पू चंदर मडके यांच्या घरावर पोलिस व सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (ता. नऊ) रात्री छापा मारला. छाप्यामध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे, बॅंक पासबुक, जमिनीच्या रजिस्ट्री सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

संशयास्पद कागदपत्रे, रजिस्ट्री, पासबुक जप्त

कळंब - विनापरवाना सावकारी करून सर्वसामान्यांना छळणाऱ्या तालुक्‍यातील मोहा येथील खासगी सावकार पप्पू चंदर मडके यांच्या घरावर पोलिस व सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (ता. नऊ) रात्री छापा मारला. छाप्यामध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे, बॅंक पासबुक, जमिनीच्या रजिस्ट्री सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

पथकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील पप्पू मडके याचा गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदा सावकारीचा गोरखधंदा सुरू होता. गुंडगिरीच्या जोरावर खासगी सावकारी करून अनेकांच्या जमिनी बळकावल्या. एक हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची बेकायदा सावकारी आहे. सावकारी करून अवाच्या सव्वा पैसे उकळले जात असून, दमदाटी करून सर्वसामान्यांना छळले जात आहे. गावातील व परिसरातील अनेकजण बेकायदा सावकारी करणाऱ्या पप्पू मडके यांच्या जाळ्यात अडकल्याचे छाप्यात संशयित सापडलेल्या रजिस्ट्रीवरून (खरेदी खतावरून) स्पष्ट होत आहे. पथकाने मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पप्पू मडके याच्या घरावर छापा मारला असता, विविध बॅंकांची पाच पासबुक, जमिनीच्या चार रजिस्ट्री, पैसे दिले-घेतल्याच्या सहा-सात ठिकाणी डायरीवर नोंदी आढळून आल्या आहेत, असे सहायक निबंधक टी. पी. बनसोडे यांनी सांगितले. 

मोहा येथील सुनील मुटकुळे यांनी या खासगी सावकाराकडून एक हजार रुपये व्याजाने घेतले होते. पाच ऑगस्ट रोजी त्यांना सावकार मडके व अन्य दोघांनी मोहा येथील चौकात बेदम मारहाण केली. अपमान असह्य झाल्याने मुटकुळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी एकाला अटक 

दरम्यान, सुनीलला बेदम मारहाण करणारा मुख्य आरोपी पप्पू मडके याचा साथीदार सुरेंद्र मडके याला पोलिसांनी मांडवा (ता. वाशी) येथून बुधवारी (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास अटक केली. या प्रकरणातील तिसरा संशयित रोहित  फरारी आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे फौजदार आर. के. तडवी यांनी सांगितले. दरम्यान, अटकेत असलेल्या पप्पू मडके याचा साथीदार सुरेंद्र मडके या दोघांना कळंबच्या न्यायालयात बुधवारी (ता. १०) हजर केले असता त्यांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Mohs banker's house raided

टॅग्स