मोकाटेंची खंडपीठात माघार, तर आव्हाडचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

औरंगाबाद - पांगरमल (जि. नगर) येथील दारूकांड प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी, तर गेणू आव्हाडने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज फेटाळला जात असल्याने मोकाटेने अर्ज मागे घेतला. तर आव्हाडचा नियमित जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

फेब्रुवारीत जिल्हा परिषद, पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणूक काळात पांगरमल येथील शिवसेनेच्या उमेदवार मंगला आव्हाड यांनी मेजवानी दिली होती. त्या वेळी बनावट दारूचा वापर करण्यात आला. त्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अकरा जणांना गंभीर विषबाधा झाली. दोन जणांना कायमचे अंधत्व आले. एकाला अर्धांगवायू झाला. या प्रकरणी एमआयाडीसी नगर पोलिस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात भाग्यश्री मोकाटे यांचा नगर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. म्हणून त्यांनी खंडपीठात धाव घेतली. अटकपूर्व जामीन फेटाळला जात असल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला, तर दुसरा संशयित आरोपी गेणू आव्हाड अटकेत असल्याने त्याने नियमित जामिनीसाठी दाखल केलेला अर्ज खंडपीठाने फेटाळून लावला. या प्रकरणातील मृतांच्या नातेवाइकांनी ऍड. संदीप आंधळे यांच्यामार्फत अर्ज करून दोघांच्या जामिनाला विरोध केला. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

Web Title: mokate form return & avad form reject by court