जरंडीच्या जिल्हा बँकेत खातेदारांच्या खात्यावरून परस्पर रक्कम हडप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोट-जरंडी जिल्हा बँकेच्या शाखेतील या प्रकारची माहिती घेवून संबंधितांना कारवाईच्या सूचना देण्यात येईल,या प्रकाराबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
- रंगनाथ काळे, संचालक, जिल्हा बँक औरंगाबाद 

औरंगाबाद : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर रक्कम काढण्याच्या प्रकार सर्रास सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने जरंडीला बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान या प्रकरणात व्यवस्थापकांनी कानावर हात ठेवल्याने पुन्हा संशयात वाढ झाली आहे.

अकरा गावातील शेतकऱ्यांचे खाते असलेल्या जरंडी (ता.सोयगाव)येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर मोठ्या रक्कमा काढून दिवसा चोरी होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.या घटनेची चौकशी करण्यासाठी बँक अनुकूल नसल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतून खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आठवडाभरात खात्यावरून परस्पर रक्कम काढण्याचा सहावा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बँक प्रशासनाने मात्र कानावर हात ठेवल्याने खातेदारामध्ये संभ्रम पसरला आहे.

केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या खात्याला सुद्ध सराईत गुन्हेगारांनी सुरुंग लावला आहे.त्यामुळे जिल्हा बँकेच्या शाखेतील खातेदारांच्या ठेवी आणि बचत असुरक्षित झाल्या आहे.या प्रकरणी बँक प्रशासनाशी संबंधित शेतकऱ्यांनी संपर्क केला असता,त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येवून पिटाळून लावण्यात येत आहे.जरंडीच्या जिल्हा बँकेत बोंडअळींच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या आहे त्यामुळे या निधीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान सराईत गुन्हेगारांचा बँक प्रशासनाकडून शोध घेण्याऐवजी उलट खातेदारांना धमकाविण्याचा प्रकार सुरु आहे.त्यामुळे संशयात पुन्हा वाढ झाली आहे.एक नव्हे तब्बल सहा वेळा खातेदारांच्या खात्यावरून परस्पर चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यावरही बँक प्रशासन कोणतीही पावले उचलत नसल्याने जरंडीची जिल्हा बँक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.या प्रकारची अध्यक्ष सुरेश पाटील यांनी चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असून शेतकऱ्यांच्या बचती व ठेवी सुरक्षित राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आदिवासी महिलेच्या खात्यावारूनही मोठी रक्कम पळविली-
निंबायती ता.सोयगाव येथील आदिवासी महिलेच्या खात्यावरून परस्पर सोळा हजाराचा विड्रोल करून भरदिवसा रक्कम पळविल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शमा तडवी यांनी दिली.या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सदरील महिलेसोबत गेल्यावर बँक प्रशासनाने टोलवाटोलवी केल्याचेही त्यांनी सांगितले.

सराईत गुन्हेगार बँकेच्या संपर्कात-
दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर रक्कमा काढण्याचा प्रकार सराईत गुन्हेगारांकडून होत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून हा सराईत गुन्हेगार हा बँकेच्या संपर्कात असल्याचेही काहींनी सांगितले.दरम्यान जिल्हा बँकेच्या परिसरात दलालांचाही मोठा सुळसुळाट झाला आहे.या दलालांच्या स्वाक्षरी शिवाय खातेदारांना पैसेच मिळत नसल्याचा पायंडा संबंधित व्यवस्थापकांनी पाडला आहे.हे या शाखेचे वैशिष्ट्य आहे. 

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
दरम्यान जिल्हा बँकेत वारंवार वावर असलेल्या अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सी-सी टीव्ही फुटेजची तपासणी करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट-जरंडी जिल्हा बँकेच्या शाखेतील या प्रकारची माहिती घेवून संबंधितांना कारवाईच्या सूचना देण्यात येईल,या प्रकाराबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
- रंगनाथ काळे, संचालक, जिल्हा बँक औरंगाबाद 

Web Title: money issue in jarandi bank