पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी पकडले अन्‌ सोडून दिले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनविण्याचे आमिष देत गंडवणाऱ्या संशयित भोंदूबाबाला बीड जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले; परंतु नंतर लगेचच सोडून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सिडको पोलिसांना हा बाबा अद्याप सापडलेला नाही, हेही विशेष.

औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनविण्याचे आमिष देत गंडवणाऱ्या संशयित भोंदूबाबाला बीड जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले; परंतु नंतर लगेचच सोडून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सिडको पोलिसांना हा बाबा अद्याप सापडलेला नाही, हेही विशेष.

हैदराबादेतील डोडू सत्यनारायण यांना पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनवितो, असा दावा साहेब पठाण ऊर्फ सत्तारबाबा याने केला व यातून त्यांची बाबाने अकरा लाखांची फसवणूक केली. फिर्यादी डोडू सत्यनारायण यांनी सांगितले, की चार मे रोजी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कारने जाताना निलंगा रस्त्यावर बीड जिल्ह्यातील पोलिसांकडून त्यांना अडविण्यात आले.

पोलिसांकडून डोडू सत्यनारायण व त्यांच्या मित्रालाच दमदाटी करून पळवून लावत बाबाला मात्र सोडून दिले. अनेकांना गंडविणारा बाबा हाताशी येऊनही त्याला सोडून दिले जाते; परंतु यावर संबंधित जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साधी चौकशीही केली जात नसेल तर ही गंभीर बाब आहे.

आपणास न्याय मिळावा, अशी डोडू सत्यनारायण यांची भावना आहे. दुसरीकडे सिडको पोलिसांचे एक पथक बाबाचा शोध घेत असले तरी त्यांना अद्याप बाबाचा ठावठिकाणा माहिती घेण्यात यश आले नाही.

Web Title: Money Rain Bhondubaba Police Release Crime