नारेगावात पुन्हा पैशांचा पाऊस!

Money-Rain
Money-Rain

औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून नारेगावातील एका ‘बाबा’ने अनेकांना गंडवल्याचा प्रकार तीन-चार वर्षांपूर्वी घडला. अगदी तीच ‘मोडस’ वापरून या ‘बाबा’ने पुन्हा ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यक्तींचे लाखो रुपये हडपले. हा प्रकार चार मे रोजी घडला, अशी तक्रार सिडको पोलिसांना प्राप्त झाली असून, यात रात्री उशिरा दोघांवर गुन्‍हा दाखल झाला.

तक्रार अर्जानुसार, डोडू सत्यनारायण (रा. न्यू एलबीनगर, मेन रोड, हैदराबाद) व सय्यद जहांगीर सय्यद अब्दुल खादब (रा. मौलाअली, हैदराबाद) यांची हजारी सुरेश खत्री (रा. धूलपेठ, हैदराबाद) यांच्याशी ओळख आहे. खत्रीने तीन वर्षांपूर्वी तक्रारदाराचे नारेगावचा साहेब खान पठाण उर्फ सत्तार बाबा याच्याशी फोनवरून बोलणे करून दिले होते. हे बाबा गरिबी, त्रास दूर करून देतील. त्यासाठी औषधी लागते, याचा खर्च मोठा असतो, असे सांगून या विधीसाठी २५ लाख रुपये लागतील, असे सांगितले होते. यावर विश्वास बसल्यानंतर ते बाबाच्या संपर्कात होते. 

१७ फेब्रुवारीला ‘बाबा’ने डोडू आणि सय्यद जहांगीर यांना भेटण्यासाठी औरंगाबादेत बोलाविले. त्यांची एका हॉटेलात भेट झाली. २५ लाख रुपये शक्‍य नाही, असे सांगताच बाबाने तडजोड केली. त्यानुसार तत्काळ दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावरून भोंदूबाबाने विधी सुरू करतो, असे सांगितले. 

सोने गहाण ठेवून जमविली रक्कम 
तक्रारदाराने सोने गहाण ठेवले. त्यानंतर ते चार मे रोजी पैसे घेऊन औरंगाबादला आले. त्यांची लॉजवर राहण्याची व्यवस्था ‘बाबा’कडून करण्यात आली. दुपारी चार वाजता बाबा स्वतःच्या कारने लॉजवर आला. त्याने साडेसहा लाख रुपये आणि दोन चेक हस्तगत केले. नंतर हैदराबादला सोबत जाण्याचे ठरविले. 

बीडमार्गे हैदराबादला जाताना सुमारे शंभर किलोमीटर गेल्यावर अनोळखी व्यक्तीला ‘बाबा’ने विधीच्या साहित्यासाठी पैसे दिले. तेथून पुढे ७० ते ८० किलोमीटर गेल्यानंतर एका पेट्रोलपंपाजवळ तोंडाला रुमाल बांधलेली व्यक्‍ती गाडीजवळ आली. ‘बाबा’ने त्याला पैसे व धनादेश दिला. तेथून पुढे २० किलोमीटरवर बाबा लघुशंकेसाठी उतरताच ‘लाल दिव्या’च्या गाडीतून एक पोलिसाच्या वर्दीतील आणि तिघे साध्या कपड्यातील लोक आले. त्यांनी दमदाटी केली, बाबाला पकडले व त्यानंतर तक्रारदाराला हैदराबादला जाण्याचा सल्ला दिला; पण ते दोघेही शहरात आले व ‘बाबां’बद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता, बाबाने अनेकांना गंडवल्याचे समोर आले. यात सिडको ठाण्यात बाबासह दोघांवर गुन्‍हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com