उधारीचे गणित अन्‌ तोंडी आमिषे!

उधारीचे गणित अन्‌ तोंडी आमिषे!

औरंगाबाद - निवडणुकीच्या आखाड्यात पैशांच्या जोरावर उड्या मारणाऱ्यांचे स्वप्न हजार, पाचशेच्या जुन्या नोटा रद्द झाल्याने भंगले आहे. निवडणुकीसाठी जमा केलेल्या लाखो, कोट्यवधी रुपयांची रद्दी झाल्याने आता नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीसाठी इच्छुकांनी पैशांऐवजी विविध प्रकारच्या वस्तू, सोन्या-चांदीचे नाणे, अंगठ्या, धान्य आणि उधारीवर का होईना ढाबे, हॉटेलमध्ये पार्ट्या देण्याचे नियोजन केले आहे. अनेकांनी त्यादृष्टीने जोरदार तयारी करून दुकानदारांना ऐनवेळी ऑर्डर मिळाली तर माल देण्याच्या तोंडी सूचनाही दिल्या आहेत. 

राजकारणात उधारीवरील शब्दावर लोक विश्‍वास ठेवण्याच्या मनस्थितीत नसतात. उमेदवार विजयी झाला तर तो दिलेला शब्द पाळेल; मात्र पडला तर तो ढुंकूनही पाहणार नाही, अशी स्थिती निवडणुकीच्या रिंगणात असते. यंदा मात्र, राजकारण्यांचा उधारीवरच भर राहणार आहे. 

मराठवाड्यात दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात 
20 पालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका 
मराठवाड्यात दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात 18 नगरपालिका, 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर या चार नगरपालिकांसाठी 14 डिसेंबरला मतदान होईल. तर तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबद या पाच नगरपालिका, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर या नऊ नगरपालिका, तर अर्धापूर, माहूर या दोन नगरपंचायतींसाठी तिसऱ्या टप्प्यात 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांनी लाखो, कोट्यवधी रुपयांचे नियोजन केले होते. मात्र, आता जवळ कोट्यवधी तर सोडा लाख रुपयेसुद्धा मिळणे अवघड असल्याने या नगरपालिका, नगरपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्या वस्तू वाटप करता येतील, यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे. 

इच्छुकांकडून चाचपणी 
नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे जास्त पैसे वाटप करता येणार नसल्याने आता विविध प्रकारच्या वस्तू, सोने-चांदी वाटपाचे नियोजन त्यांनी केले आहे. वस्तूंमध्ये अनेकजण शिलाई मशीन, उमेदवारांचे चिन्ह छत्री असेल तर छत्र्या वाटप, साड्या, कपडे, कपाट, भांडी, गरजूंना धान्याचे पाकीट, विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. तर वॉर्डातील विशेष मतांचा गठ्ठा असलेल्या कार्यकर्त्याला खूश करण्यासाठी सोने, चांदीचे नाणे, अंगठी देण्याचा विचारही होत आहे. 

पार्ट्यांवर जोर; मात्र उधारीवर! 
निवडणुकीच्या काळात पार्ट्या आणि दारूचा महापूर असतो. मात्र, सध्या लोकांना चार हजार रुपयेसुद्धा मिळणे अवघड झालेले आहे. त्यातच 18 डिसेंबरपर्यंत दुसरा आणि तिसरा टप्पा संपणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना जोरदार पार्ट्या आणि देशी, विदेशी दारूचे डोस देण्याचा मनसुबा काही जण आखत आहेत. मात्र, पार्ट्या देताना हॉटेल, ढाब्यांची बिले लाखोंच्या घरात जातात. त्यावर नामी उपाय शोधून काढण्यात आला आहे. यात हॉटेलचालकांना एकतर उधारीवर किंवा पुढील तारखेचा चेक देऊन काम कसे भागविता येईल, यासाठी इच्छुकांचे नियोजन सुरू आहे. 

माघार कशी घ्यायला लावायची? 
पहिल्या टप्प्यातील पालिकांसाठी प्रचार सुरू झालेला असला आहे. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी एखाद्या तगड्या उमेदवाराला माघार कशी घ्यायला लावायची? त्याच्या बदल्यात आता त्याला एवढे पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्‍न इच्छुक उमेदवारांना पडले आहेत. शब्दावरून माघार घेणे जोखमीचे आहे. उमेदवार पडला तर तो नंतर एक रुपयाही देणार नाही. त्यामुळे आधीच त्याच्याकडून काही सोने-चांदीची वस्तू मिळते का, अशी वस्तू देता येईल का, यासाठीही प्रयत्न केला जाताना दिसतोय. 

पक्षांच्या नेत्यांचेही नियोजन 
इच्छुक उमेदवारांसोबत, प्रमुख पक्षांच्या नेत्यांनाही नगरपालिका निवडणुकीचे टेन्शन आहे. आपली सत्ता कायम राहावी, जास्तीत जास्त नगरसेवक विजयी करण्यासाठी या नेत्यांनी अगोदरच नियोजन केले होते. मात्र, हजार पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्याने ते कोलमडले आहे. आता नियोजन करता-करता त्यांच्याही नाकीनऊ येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com