मॉन्सून परतला, तरीही का पडतोय पाऊस? या भागात इशारा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवरही पाणी, ऐन सुगीच्या काळात परतीच्या पावसाने वाढवली चिंता 

औरंगाबाद - दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होत आहे. पण, हा अवेळी पाऊस का पडत आहे, या बाबत हवामान विभागाचे पुणेने सांगितले, की अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांच्या परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे दक्षिणेकडून अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरूनही वारे महाराष्ट्रात येत आहेत. हे दोन्ही वारे मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि मराठवाड्याच्या परिसरावर एकमेकांना धडकत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 
  
सोमवारी या भागात वादळी पावसाची शक्‍यता 
सोमवारी (ता. 21) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना विजांसही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठत्ताड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. पावसाचा जोर मंगळवारपर्यंत (ता. 22) कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 
  
खरिपाचे मोठे नुकसान 
खरिपाची पीक काढणी सुरू झाली आहे. अशातच काही भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जेही थोडेफार पीक हातात येणार होते त्या पिकांचे नुकसान होणार असून, उरल्या-सुरल्या आशेवरही पावसाने पाणी फेरले आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. यंदा विदर्भ-मराठवाड्यात खरीप पिकाला ज्यावेळी पाऊस आवश्‍यक होता त्यावेळी नेमका तो आला नाही. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. आता पीक काढणी सुरू आहे. असे असताना दोन दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हाती आलेले पीक भिजून नुकसान होणार आहे. 
 
पक्ष्यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम 
पक्ष्यांचे जीवन ऋतू चक्रावर अबलंबून आहे. मॉन्सूनोत्तर पावसाचा पक्ष्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली. अवेळी पावसामुळे पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाचे चक्र बदलू शकते. उन्हाळा लागण्यापूर्वी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ होतो. पावसाची लक्षणे दिसू लागताच अनेक पक्षी घरटी बांधायला घेतात व अंडी घालण्याची पूर्वतयारी सुरू करतात.

पक्ष्यांचे जीवनचक्र ऋतूंशी निगडित असलेल्या या बाबीवर अवकाळी पावसाने परिणाम होणार आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास नेहमीच्या विणीच्या हंगामानंतरही पक्ष्यांची घरटी बांधणे व अंडी घालण्याची प्रक्रिया सुरूच राहू शकते, असे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शिवाय राज्यात दरवर्षी वेळेवर येणाऱ्या परदेशी पक्ष्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon over. But why raining in some areas : read that Areas