उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी 

सयाजी शेळके 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : महिन्याभराच्या विश्रांतीनगर पावसाने बुधवारपासून (ता. १५) जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी रात्रीपासून बहुतांश ठिकाणी संततधार सुरू असून खरीप पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सरासरी ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगरूळ (ता. तुळजापूर) महसूल मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस सोनारी (ता. परंडा) मंडळात केवळ नऊ मिलीमीटर झाला आहे. 

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिप पिके कोमेजू लागली होती. हलक्या जमिनीतील पिकांनी माना टाकल्या होत्या. यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. दरम्यान महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वदूर दमदार सरासरी ४७ मिलीमीटर पाऊस झाला अाहे. तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील सात पैकी पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस मंगरूळ महसूल मंडळात सुमारे १५० मिलीमीटर झाला आहे. त्यापाठोपाठ इटकळ मंडळात १२५ मिलीमीटर, सावरगाव ९७, नळदूर्ग ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातील डाळींब महसूल मंडळातही चांगला पाऊस झाला असून ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परंडा तालुक्याला पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सोनारी महसूल मंडळात केवळ नऊ तर अनाळा महसूल मंडळात १८ मिलीमीटर पावसाची नोदं झाली आहे. दरम्यान पावसाच्या संतधार सुरू असल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला. सकाळच्या सत्रात मुलांची उपस्थितीही शाळेत कमी जाणवत होती. रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. जागोजागी खड्ड्‍यात पाणी साचले होते. 

Web Title: Monsoon Rain in Osmanabad