चंद्र आणि गुरुची युती, शकुन की अपशकुन? वाचा

सुषेन जाधव
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • चंद्र आणि गुरूचे आज ग्रहण 
  • आगळीवेगळी "पिधानयुती' पाहावयास मिळणार 
  • आज सायंकाळी अदभूत प्रेक्षणीय खगोलीय घटना पहा 
  • पिधानयुती म्हणजे काय ?

औरंगाबाद : पश्‍चिम आकाशात पृथ्वीचा चंद्र आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूचे ग्रहण अर्थात "पिधानयुती' गुरुवारी (ता. 28) सायंकाळी पाहायला मिळणार आहे. ही एक अद्‌भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे. आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते; परंतु "पिधानयुती'देखील एकप्रकारचे ग्रहणच असते. ही पिधानयुती अनेकदा होते; पण आपल्या भागातून दिसण्याचा हा योग खूप वर्षांनंतर आल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

 

ही पिधानयुती महाराष्ट्रासह उत्तर भारत, नेपाळ व तिबेट या भागांतून पाहायला मिळणार आहे. यावेळेस गुरू ग्रहाची तेजस्विता ही उणे 1.84 असणार आहे. या ग्रहाच्या पूर्वेला तेजस्वी शुक्र ग्रहसुद्धा दिसणार आहे. त्याची तेजस्विता ही उणे 3.87 एवढी असणार आहे. यावेळेस चंद्र, गुरू व शुक्र हे तीनही खगोलीय पिंड धनु राशीत असणार आहेत. 

jupiter n moon occultation.jpg

गुरुची २८ नोव्हेंबरची पिधानयुती (छायाचित्रे सौजन्य : श्रीनिवास औंधकर)

गुरुवारी सायंकाळी सूर्य मावळत असताना चंद्राची द्वितीयेची कोर अतिशय विरळ दिसेल. यावेळेस गुरू ग्रह चंद्राच्या सावलीकडील भागातून सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी चंद्राच्या पाठीमागे लपण्यास सुरवात करेल. ही घटना केवळ दुर्बिणीद्वारे पाहायला मिळणार असल्याचेही श्री. औंधकर म्हणाले.

occultation start.jpg
गुरुग्रह आणि चंद्रकोरची २८ नोव्हेंबरला ५:०९ वाजता अशी असेल स्थिती 

मात्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालील भागातून गुरू ग्रह बाहेर पडेल तेव्हा हा प्रसंग विलोभनीय असणार आहे. यावेळेस अंधार असल्यामुळे हा प्रसंग नुसत्या डोळ्यांनीही पाहायला मिळणार आहे. 

occultation end.jpg
गुरुग्रह आणि चंद्रकोरची २८ नोव्हेंबरला ६:१० वाजता अशी असेल स्थिती 

काय आहे पिधानयुती? 
जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यात पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते, तसेच सूर्यमालेतील एखादा ग्रह आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला की ग्रहण होते अर्थात "पिधानयुती' होते. या ग्रहणाला "पिधानयुती' (Occultation) असे म्हणतात. चंद्र ज्यावेळी एखाद्या तेजस्वी ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो, याला "पिधानयुती' असे म्हणतात. 

हेही वाचा - तिने देहविक्रयसाठी दिला स्वतःचा फ्लॅट, नंतर.....

निसर्गाचा चमत्कारच 
पूर्ण पिधानयुती (Total Occultation) व स्पर्शीय पिधानयुती (Grazing Occultation) असे पिधानयुतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ जवळजवळ एक तासाचा असतो. स्पर्शीय पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या उत्तर किवा दक्षिण ध्रुवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करीत असल्याने हा काळ खूप छोटा असतो. 

इथे बघा मोफत पिधानयुती 
या पिधानयुतीचा अद्‌भुत नजारा दुर्बिण व द्विनेत्रीमधून सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांपासून सहा वाजून 15 मिनिटांपर्यंत एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्‍लब येथे पाहता येणार आहे. इच्छुकांनी उपस्थित राहावे, असेही श्री. औंधकर यांनी कळविले आहे. 

आकाशातील तेजस्वी तारे किंवा ग्रह याला चंद्राने ग्रासलं किंवा ग्रहण केलं की याला पिधानयुती असे म्हणतात. आज होणारी खगोलीय घटना पहावसायस मिळणार आहे. मात्र शुक्‍ल पक्षातील द्वितीयाची कोर असल्याने चंद्राच्या पाठीमागे लपणारा गुरु ग्रह पहावयास जरासा अवघड जाणार आहे. मात्र सहा वाजून दहा मिनीटाला ज्यावेळ गुरु ग्रह चंद्राच्या पश्‍चिम बाजूने बाहेर पडेल त्यावेळेस ही दुर्मिळ घटना पहाण्याचा आनंदच निराळा असेल. 
- श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moon and Jupiter's' Occultation