दंगलीत १० कोटींहून अधिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या दंगलीत शुक्रवारी आणि शनिवारी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यातील नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवस पाच पथकांमार्फत पंचनामे करण्यात आले. यात १० कोटी २१ लाख १५ हजार सहाशे रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल मंगळवारी (ता. १५) जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला.

दंगलग्रस्त भागात तणावाची स्थिती असल्याने शनिवारी व रविवारी पंचनामे करणे प्रशासनाने टाळले; मात्र सोमवारी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. यासाठी महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक परिवहन आणि महानगरपालिकेचा समावेश असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाच पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी वस्तुस्थितिदर्शक पंचनामे करून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे. 

या पाचही पथकांनी पंचनामे करून ६४ वाहनधारकांच्या जबाबांनुसार १ कोटी २७ लाख ७३ हजार पाचशे रुपये, तर ७५ घरे व दुकानधारकांच्या जबाबांनुसार ८ कोटी ९३ लाख ४२ हजार शंभर रुपये, असे एकूण १० कोटी २१ लाख १५ हजार सहाशे रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. पथकप्रमुख म्हणून अपर तहसीलदार रमेश मुनलोड, नगर भूमापन अधिकारी के. आर. मिसाळ, महापालिकेचे वॉर्ड अधिकारी अस्लम खान, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते, उपअभियंता फारुक खान यांचा समावेश होता.

Web Title: More than 10 crore losses in aurangabad riots