मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

खेळताना पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचवताना आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धोंदलगाव (ता.वैजापूर) येथे गुरुवारी (ता.31) दुपारी बारा वाजता घडली. सोनाली राजू आघाम (वय22) व तिचा चार वर्षांचा मुलगा प्रथमेश (रा.गुरुधानोरा, ता.गंगापूर) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. सोनाली ही भाऊबीजेसाठी धोंदलगाव येथे माहेरी भाऊ कृष्णा सुखदेव करवंदे यांच्याकडे प्रथमेश (वय चार) व अन्वेश (वय तीन) या दोन्ही मुलांना घेऊन आली होती.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः खेळताना पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचवताना आई व मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धोंदलगाव (ता.वैजापूर) येथे गुरुवारी (ता.31) दुपारी बारा वाजता घडली. सोनाली राजू आघाम (वय22) व तिचा चार वर्षांचा मुलगा प्रथमेश (रा.गुरुधानोरा, ता.गंगापूर) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. सोनाली ही भाऊबीजेसाठी धोंदलगाव येथे माहेरी भाऊ कृष्णा सुखदेव करवंदे यांच्याकडे प्रथमेश (वय चार) व अन्वेश (वय तीन) या दोन्ही मुलांना घेऊन आली होती.

करवंदे हे धोंदलगाव शिवारात शेतात नदीकाठी राहतात. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराने नदीपात्रात खोदाकाम करून मुरूम काढल्याने नदीपात्र खोल झाले आहे. या नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दुपारी बाराच्या सुमारास सोनाली ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. त्यावेळी आईची नजर चुकवून अन्वेश हा खेळत खेळत तिच्यामागे आला. खेळताना पाय घसरून तो पाण्यात पडला.

आई सोनाली हिच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुलाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात उडी मारली. मात्र पाणी जास्त असल्याने मायलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नातेवाइकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी चार वाजता दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास ग्रामस्थांना यश आले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother And Her Son Drowned