धक्कादायक, विजेचा शॉक लागून माय-लेकराचा मृत्यू 

जगदीश जोगदंड | Monday, 28 September 2020

पूर्णा तालुक्यात घरावरील पत्रात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागल्याने माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू तर दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदरील घटना ही कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथे सोमवारी (ता.२८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. हाती आलेला सव्वीस वर्षाचा मुलगा व पत्नी मृत्यूमुखी पडल्याने व लहाना मुलगाही गंभीर असल्याने दु:खावेगात बबन चव्हाण यांचा हृदयद्रावक टाहो ऐकून उपस्थितांनाही गलबलून आले. 

पूर्णाः  घरावरील पत्रात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागल्याने माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू तर दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदरील घटना ही कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथे सोमवारी (ता.२८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

कामगार असलेले बबन चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह कात्नेश्वर येथे राहतात. मुलगा आकाश हा परभणी येथे आपल्या पत्नीसह राहतो. आकाश परभणी येथून आपल्या आई-वडीलांना भेटण्यासाठी आजच आला होता. त्याने कामानिमित्त घराच्या पत्राला हात लावताच पत्र्यात उतरलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे आकाश हा घराच्या पत्राला चिकटला. त्याला सोडविण्यासाठी त्याची आई जिजाबाई ही गेली असता ती पण चिकटली. 

हेही वाचादुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -

धाकटा मुलगा सुध्दा चिकटला 
दोघे चिकटल्याचे पाहुण विकास हा त्यांचा धाकटा मुलगा सोडवण्यासाठी धावला असता तो पण चिकटला. घरात असलेल्या बननरावांनी आरडाओरड केली. ती ऐकून कोणीतरी रोहीत्राहून विद्युत पुरवठा खंडीत केला. या वेळी जिजाबाई (वय ४५) व आकाश (वय २६) हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

जखमी विकासला परभणीला हलविले 

घटना समजताच ग्रामपंचायत कार्यालयात असलेले सरपंच प्रकाश गलांडे, विस्तार अधिकारी साहेबराव सुरेवाड, ग्रामसेवक श्री.जवंजाळ, पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर हे धावत घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिघांनाही एरंडेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. आकाश व जिजाबाई यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तर जखमी असलेल्या वीस वर्षीय विकास याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मयत माय लेकरांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. हाती आलेला सव्वीस वर्षाचा मुलगा व पत्नी मृत्यूमुखी पडल्याने व लहाना मुलगाही गंभीर असल्याने दु:खावेगात बबन चव्हाण यांचा हृदयद्रावक टाहो ऐकून उपस्थितांनाही गलबलून आले. 

संपादन ः राजन मंगरुळकर