औटघटकेच्या मातृत्वाचा नाजूक कळ्यांना दंश

मनोज साखरे
सोमवार, 5 डिसेंबर 2016

'मुलं सोडण्याचे प्रमाण वाढत असून, ही एक सामाजिक समस्या आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय समाजसेवा केंद्र व साकार बालगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पाळणा ठेवलेला आहे. नको असलेल्या नवजात बाळांना त्यांच्या माता, पालकांनी बालगृहाजवळील पाळण्यात ठेवावे. अशांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.''

- रेणुका घुले, अध्यक्षा, बालकल्याण समिती

जन्मानंतर चिमुकलींना फेकतात निर्जनस्थळी, उकिरड्यावर अन्‌ झुडुपात
औरंगाबाद - "मुलगाच हवा, मुलगी नकोच,' ही मानसिकता अद्यापही कमी झालेली नाही. त्यातच अनैतिक, विवाहबाह्य सबंधांतून मुले जन्माला आली, तर त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे प्रमाण वाढत आहे. हातून घडलेले कुकर्म समाजाच्या नजरेत येऊ नये यासाठी टोकाचे पाऊल उचलले जाते. औटघटकेच्या मातृत्वातून नाजूक कळ्या खुडण्याचे अघोरी कृत्य केले जाते.

एकीकडे मुली सर्वोच्च शिखर पादाक्रांत करीत असताना दुसरीकडे तिची अवहेलना सुरूच आहे. जन्माआधीच अशा कळ्या खुडल्या जात आहेत, तर जन्मानंतर काहींना निर्जनस्थळी, उकिरड्यावर, झुडुपात सोडले जात आहे. अशा प्रकारामुळे हिंसक पशू, प्राणी यांच्या चपाट्यात कितीतरी मुली-मुलं आली आणि त्यांना नाहक जीव गमवावा लागला. अर्भक सापडल्याच्या, ते मृत असल्याच्या असंख्य घटना उघडकीस आल्या असून यामुळे अमानवी कृत्य, निर्दयीपणा समोर आला आहे. औरंगाबादसारख्या शहरात नवजात बाळांना सोडण्याचे प्रमाण आता वाढत आहे. अशी नवजात सोडलेली मुलं दिसली तर वाचतात, अन्यथा, वातावरण प्राण्यांचे भक्ष्य होऊन गतप्राण होतात. मुलं सोडून देण्याचे, त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचे प्रमाण गंभीर आहे. एप्रिल 2015 ते 30 नोव्हेंबर या काळात फेकलेल्यांपैकी सुमारे 25 टक्केच मुलं वाचली आहेत. एकोणावीस महिन्यांत शहरात सोडलेल्या सुमारे 21 मुलांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांचे संगोपन व काळजी बालकल्याण समितीच्या निगराणीत सुरू असून यातील बहुतांश मुलं दत्तक घेण्यात आली आहेत.

लाखमोलाचा जीव कचऱ्यात
तिसरी मुलगीच झाली किंवा मुलीच होत आहेत अशी ओरड समाजात नेहमीच होते. त्यातून महिलेलाच दोष दिला जातो. तिलाही कुटुंबात नाहक त्रास होतो. अशी कुटुंबेही कधी-कधी नवजात बाळांना रस्त्यावर, रानावनात, कचऱ्यात फेकण्याचा आग्रह धरतात. सिल्लोड तालुक्‍यात असा प्रकार घडला.

त्यापेक्षा हे करा
अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बाळांना समाजाच्या भीतीने उकिरड्यावर, कचऱ्यात व निर्मनुष्य जागी सोडले जाते. ही घृणास्पद बाब असून त्याऐवजी त्यांना बालगृहात ठेवावे, तेथील पाळणाघरातही ठेवले जाऊ शकते. यामुळे निष्पाप बाळांचा जीव तरी वाचेल आणि गुन्हाही दाखल होणार नाही.

वाढत्या घटनांची कारणे

 • वाढते शहरीकरण
 • एकत्र कुटुंबपद्धतीला फाटा
 • विभक्त कुटुंबपद्धतीचा अंगीकार
 • व्यक्तींचा कुटुंबात एकमेकांवर अविश्‍वास
 • उशिराने होणारे विवाह, वाढलेली चैन
 • आधुनिकीकरणात अनैतिक संबंधांत वाढ
 • विवाहपूर्व संबंधातून आलेले मातृत्व
 • कुमारी मातांचे वाढणारे प्रमाण

अलीकडच्या घटना

 • गेवराई परिसरात ऑगस्टमध्ये रानात मुलगी सापडली
 • तीस नोव्हेंबरला कारमधून आलेल्यांनी हर्सूल भागात मुलगी सोडली
 • अनैतिक संबंधांतून जन्मानंतर सिडकोत मुलीचा आईने जुलैत जीव घेतला
 • घाटी परिसरात नोव्हेंबरमध्ये तीन बाळांना वाऱ्यावर सोडून दिले
 • मुलगी नको म्हणून सिल्लोड येथील एका बापाने मुलीला घाटीत सोडले
Web Title: motherhood delicate bite child