सोळावं वर्ष परवान्याचं नाहीच! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मोटार वाहन कायद्याप्रमाणे सोळा वर्षांच्या युवकांना पूर्वी पन्नास सीसी क्षमतेच्या बाईकचा परवाना मिळत होता; मात्र आता वाहन कंपन्यांनी ५० सीसी क्षमतेच्या दुचाकीच बंद केल्या आहेत. त्यामुळे परवाना देणार तरी कोणत्या वाहनासाठी असा पेच निर्माण झाला आहे.

औरंगाबाद - मोटार वाहन कायद्याप्रमाणे सोळा वर्षांच्या युवकांना पूर्वी पन्नास सीसी क्षमतेच्या बाईकचा परवाना मिळत होता; मात्र आता वाहन कंपन्यांनी ५० सीसी क्षमतेच्या दुचाकीच बंद केल्या आहेत. त्यामुळे परवाना देणार तरी कोणत्या वाहनासाठी असा पेच निर्माण झाला आहे. शिवाय आता नवीन मोटार वाहन कायद्यातही या युवावर्गाचा विचार झाला नाही. उलट शिक्षेची तरतूद करण्यात आली. शिक्षेच्या तरतुदीने हा प्रश्‍न सुटण्याऐवजी अधिकच जटिल झाला असून, सोळावं वर्ष वाहन परवान्याचे नाहीच असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

मोटार वाहन कायद्याप्रमाणे सोळा वर्षांच्या युवकांना वाहन परवाना मिळत नाही. पूर्वी पन्नास सीसी क्षमतेच्या बाईकचा पर्याय होता. त्यावेळी मात्र सोळा ते अठरा वर्षांतील युवावर्गाला पन्नास सीसी क्षमतेच्या दुचाकीचा परवाना मिळत होता. हा वर्गही ५० सीसी दुचाकी वापरून आपली गरज भागवत होता; मात्र वाहन कंपन्यांनी ५० सीसी क्षमतेच्या दुचाकी बंद केल्या आहेत. या दुचाकी बंद झाल्यापासून सोळा ते अठरा वर्षांतील युवा वर्गाची पंचाईत झाली. 

साधारण अकरावी आणि बारावी वर्गातील या मुलांना महाविद्यालयात आणि क्‍लासला जाण्यासाठी दुचाकीची गरज असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रत्येक शहरात नाही किंवा ती सोयिस्कर नाही. त्यामुळे युवकांना महाविद्यालयात व क्‍लासेसला जाण्यासाठी नाइलाजाने विनापरवाना शंभर सीसी दुचाकी चालवावी लागत आहे.

सुसाट पळवतात दुचाकी
सोळा वर्षांची मुले सुसाट दुचाकी चालवतात; मात्र जुन्या कायद्याला मर्यादा आल्या आणि नवीन कायद्याने विचार केला नाही. त्यामुळेच आजही हा युवावर्ग शंभर सीसीच्या दुचाकी (विनापरवाना) भन्नाट रस्त्यावरून पळवताना दिसत आहेत. असे असले तरीही नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता जर सोळा ते अठरा वर्षांच्या मुलांनी दुचाकी चालवल्यास पालकांवर गुन्हा दाखल होऊन तीन वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या काळात युवावर्गाची पंचाईत होणार असून, पालक आणि पोलिस असा संघर्ष दिसणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motor vehicle laws