पाच दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

वैजापूर : पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. तौसिफ शब्बीर शेख (वय 24) व रिजवान जब्बार शेख (वय 24) अशी त्यांची नावे असून दोघेही नाशिक जिल्ह्यातील ओझर (ता. निफाड) येथील रहिवासी आहेत.

वैजापूर, (जि. औरंगाबाद)  : पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. तौसिफ शब्बीर शेख (वय 24) व रिजवान जब्बार शेख (वय 24) अशी त्यांची नावे असून दोघेही नाशिक जिल्ह्यातील ओझर (ता. निफाड) येथील रहिवासी आहेत. त्यांनी वैजापूर येथील पीरजाद गल्लीत राहणाऱ्या अब्रार शेख यांच्या घरी चोरीच्या तीन दुचाकी ठेवल्याचे पोलिसांना समजल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. आरोपींकडून दुचाकीचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 
वैजापूर येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येत असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख, नाईक तमनार, श्री. थोरात, बाबासाहेब जराड, सागर शिंदे, सागर बोराडे यांच्या पथकाने पीरजाद गल्लीत छापा टाकून अब्रार शेख याच्याकडून तीन दुचाकी ताब्यात घेतल्या.

याबाबत विचारपूस केली असता त्याने या दुचाकी ओझर येथील त्याचे नातेवाईक तौसिफ शेख व त्याचा मित्र रिझवान शेख यांनी आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी नाशिक येथे जाऊन दोन आरोपींना बेड्या ठोकल्या व त्यांच्याकडून आणखी दोन दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील असल्याने हस्तगत करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motorcycle thief arrested by vaijapur police