वालसावंगीच्या कोतवालाला खुणावतेय एव्हरेस्ट 

वालसावंगी : तेझिंग खांग हिमशिखर गाठणारा राहुल ताडे. 
वालसावंगी : तेझिंग खांग हिमशिखर गाठणारा राहुल ताडे. 

वालसावंगी (जि. जालना)  : महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर, तब्बल सहा हजार मीटर उंचीचे सिक्‍कीमजवळील तेझिंग खांग हे हिमशिखर सर केल्यानंतर वालसावंगीच्या कोतवालाला आता माऊंट एव्हरेस्ट शिखर खुणावत आहे. जिद्द आणि चिकाटीसोबतच सर्वांच्या मदतीने आपण हे शिखर पादाक्रांत करू, असा विश्‍वास त्यांना आहे. राहुल साहेबराव ताडे (वय 26) असे या युवा कोतवालाचे नाव. 

भोकरदन तालुक्‍यातील वालसा वडाळा येथील राहुल ताडे याचे शालेय शिक्षण गावातच झालेले. मोलमजुरी करून भोकरदनला पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. नोकरीसाठी प्रयत्न केले, वर्ष 2015 मध्ये त्याला कोतवालाची नोकरी लागली. अर्थात, या नोकरीसोबतच त्याने एक छंद जोपासला, गिर्यारोहणाचा. वालसावंगीच्या परिसरात जाळीचा देवसह विविध डोंगररांगा आहेत. त्यामुळे त्याच्या आवडीला चालनाच मिळाली.

अलीकडेच राहुल याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई हे शिखर सर केले केवळ 1 तास 30 मिनिटांत. अर्थात, कुठल्याही गिर्यारोहकाला खुणावतो ते एव्हरेस्ट. त्यादृष्टीने राहुल याने प्रयत्न सुरू केले. काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये प्रशिक्षण घेऊन तेझिंग खांग हे हिमशिखर सर केले. आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये त्याचा माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार तो तयारी करीत आहे. विशेष म्हणजे सर्व मोहिमेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तहसीलदार संतोष गोरड यांनी त्याला वेळोवेळी मदत केली, मार्गदर्शन केले आहे.

जवळपास तीस लाखांचा खर्च अपेक्षित 
माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी राहुलला जवळपास तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अर्थात, प्रशासन, दानशूरांकडून मदत मिळाल्यास या खर्चाचा मेळ जमल्यास याबाबत जपानमध्ये विशेष प्रशिक्षण तो घेणार आहे. 

आई-वडील, अधिकारी, मित्रांच्या साथीमुळे मी विविध शिखरे सर करीत आहेत. येणाऱ्या काळात माऊंट एव्हरेस्ट हे हिमशिखर सर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अथक परिश्रमाची तयारी व चिकाटी असल्यास काहीच अवघड राहत नाही, असे मला वाटते. 
- राहुल ताडे 
----- 
तेझिंग खांग, कळसूबाई शिखर सर केलेल्या राहुलचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. जिल्ह्याचे नाव त्याने महाराष्ट्रत झळकविले आहे, त्याच्या पुढील मोहिमेसाठी शक्‍य ते प्रयत्न करण्यात येतील. 
- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी 
----- 
राहुल ताडे याची गिर्यारोहणातील कामगिरी ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार; तसेच यानिमित्त शक्‍य ती आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 
- रंजना आहेर, 
सरपंच, वालसावंगी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com