मराठवाड्यात रुजतेय देहदानाची चळवळ

योगेश पायघन
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019


घाटीत दीड वर्षात 42 मृतदेह दान ः प्रोत्साहनासाठी करणार ऋणनिर्देश 
 

औरंगाबाद- वैद्यकीय शिक्षणात वैद्यकीय कौशल्य, शरीररचना समजून घेण्यासाठी मृतदेहांची आवश्‍यकता असते. अवयवदान व प्रत्यारोपणात इतिहास रचू पाहणाऱ्या मराठवाड्यात देहदानाची चळवळही फुलत आहे. गेल्या दीड वर्षात घाटी रुग्णालयात तब्बल 41 देहदान झाले आहेत. मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयांत वर्षाकाठी 40 ते 45 देहदान होतात. त्या तुलनेत मराठवाड्यातील हे प्रमाण लक्षणीय असल्याचा दावा येथील तज्ज्ञांनी केला आहे. 

कसा उपयोग होतो विद्यार्थ्यांना? 
दहा विद्यार्थ्यांमागे साधारण एक मृददेह शिकण्यासाठी आवश्‍यक असतो. त्यानुसार घाटीत 150 विद्यार्थ्यांमागे 15, तर दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तीन, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन मृतदेहांची वर्षाकाठी गरज असते. असे 20 ते 25 मृतदेह वर्षाकाठी लागतात; तसेच अवयव संग्रहालय, संशोधनासाठी मृददेह लागतात. घाटीत वर्षांकाठी 25 ते 30 देहदान होत असून त्यापैकी काही मृतदेह इतर शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांसाठी पुरवले जातात. 
----- 
कसे कराल देहदान? 
व्यक्ती 18 वर्षांखालील असल्यास देहदानासाठी त्याने पालकांची संमती घेणे गरजेचे आहे, तर 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्ती संमतिपत्र भरून देऊ शकतात; तसेच मृत्युनंतर संबंधित लोक आपले देहदान करू शकतात. यामध्ये जंतुसंसर्ग, जळालेल्या घटनेतील, कावीळ, शवविच्छेदन झालेले, एमएलसी प्रकरणांतील मृतदेहांचे देह स्वीकारले जात नाहीत. मृत्युनंतर उन्हाळ्यात चार ते सहा, तर पावसाळा व हिवाळ्यात आठ ते 12 तासांचे नोंदणीकृत डॉक्‍टरांनी दिलेले मृत्युप्रमाणपत्र असल्यास देहदान करता येते. 

वर्षानुवर्षे होते जतन 
मृतदेह दान केल्यानंतर तो मृतदेह एम्बाल्मिंग करण्यात येतो. कुजण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी फॉर्मलीन, स्पीरिट, ग्लीसरीन व पाणी याच्या मिश्रणाने मृतदेहाचे जतन केले जाते. देहदानाच्या वर्षभरानंतर गरजेनुसार त्याला वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोगात आणले जाते. साधारण 20 ते 25 वर्षे त्याचे जतन केले जाते. 

देहदानामुळे तज्ज्ञ, कौशल्य विकसित झालेला डॉक्‍टर समाजात सेवा देईल. त्याला शिकण्यासाठी देहदान गरजेचे आहे. देहदानाचे प्रमाण अधिकचे असले तरी ही चळवळ म्हणून रुजविण्यासाठी व्याख्यानांसह विविध कार्यक्रमांच्या आधारे जनजागृती करीत आहोत. समाजातील प्रतिष्ठित लोक देहदान करीत असल्याने त्यांच्या या निर्णयाचे बरेच लोक अनुकरण करीत आहेत. 
-डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी. 

सोशल मीडियातून जनजागृती 
जिल्ह्यात कीर्तनकार, सामाजिक संस्थाही देहदानासाठी जनजागृती करीत आहेत; तसेच खासगी कंपनीतील निवृत्त अधिकारी व सध्या शेती करीत असलेल्या मच्छिंद्र सोनवणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच देहदान करण्याची भावनिक साद घातली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The movement of the body donetion is rooted