दोन-तीन विटा पडल्याने भिंत खचत नाही : डॉ. कोल्हे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

परभणी : भाजप सरकारला राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास नसल्याने सत्तेचा गैरवापर करीत इकडून-तिकडून माणसे जमवली जात आहेत. वरच्या दोन-तीन विटा पडल्या म्हणून सारी भिंत खचत किंवा कोसळत नसते. त्याचप्रमाणे तळातला कार्यकर्ता मजबूत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही मजबूत आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपच्या सध्याच्या राजकारणावर हल्लाबोल केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची "शिवस्वराज्य यात्रा' गुरुवारी (ता. 22) परभणीत दाखल झाली. त्या वेळी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ. कोल्हे यांनी युवक-युवतींशी संवाद साधला. ते म्हणाले, "विद्यमान सरकारकडून युवकांच्या भावनांचा खेळ मांडला जात आहे. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा झाला असून, "मेगा भरती'च्या नावाचे गाजर दाखविणाऱ्या सरकारला युवाशक्तीने धडा शिकवला पाहिजे. व्यवस्था बदलायची असेल, तर आधी सरकार बदलायला हवे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास सहा महिन्यांत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून मेगा नोकरभरती करू.'' 
आमदार रामराव वडकुते, माजी महापौर प्रताप देशमुख, संगीता वडकर आदी उपस्थित होते. 

पूरस्थितीचे गांभीर्य नाही 
सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता, असे सूत्र अवलंबत विद्यमान सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत आहे, असा आरोप करून डॉ. कोल्हे म्हणाले, "आलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले असते, तर एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली नसती. दोन्ही राज्यांत भाजप सरकार असतानाही पुराचे गांभार्य ओळखले नाही, याचे आश्‍चर्य वाटते.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Amol Kolhe speaks at Parbhani about NCP