शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा : राजेनिंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, तो सहन करतोय; पण याद राखा, आमचे लोक बॅंकेत घुसल्यावर पळू नका, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दिला. सोमवारी (ता.19) सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

तानाजी जाधवर 
उस्मानाबाद : शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, तो सहन करतोय; पण याद राखा, आमचे लोक बॅंकेत घुसल्यावर पळू नका, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दिला. सोमवारी (ता.19) सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे या बैठकीत नागरिकांना देखील आमंत्रित करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. 

जिल्ह्यात आत्तापर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांनी केवळ अकरा टक्के पिक कर्ज वाटप केले आहे. शेतकरी चकरा मारत असतानाही याबाबत उदासिन धोरण अवलंबिले जात असल्याने खासदार राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बॅंक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. खासदार राजेनिंबाळकर यांनी सुरवातीलाच प्रशासनासह बॅंक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शेतकरी व सामान्य जनतेच्या जीवावर तुमच्या बॅंका चालतात, तुम्ही त्यांचीच पिळवणुक करता. हे बंद झाल पाहिजे, अन्यथा आमची लोक बॅंकेत घुसली तर पुन्हा पळू नका, असा गर्भित इशाराच राजेनिंबाळकर यांनी दिला. या वेळी अनेक नागरिकांनी मांडलेल्या एक ना एक समस्येवर खासदारांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेतले. पिक कर्जाच्या प्रकरणात वेगवेगळया कारणामुळे कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करीत असल्याचे उघड झाले. 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनीही बॅंकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शिवाय यापुढे अशा कोणत्याही बॅंकेने कर्ज देण्यास हयगय केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला. सध्या खरीप पिक कर्जाच्या वाटपास काही दिवसच मुदत राहिली आहे. तरीही आत्तापर्यंत फक्त अकराच टक्के वितरण केल्याचे निदर्शनास आले आहे. आजची बैठक सुमारे तीन तास सुरु होती. प्रत्येक शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे निकाली काढल्याशिवाय ही बैठक संपणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मुद्रा लोण, महामंडळ कर्ज योजना व एटीएमच्या समस्याचाही आढावा या वेळी घेण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यांच्यामध्ये पात्र न ठरलेल्या शेतकऱ्यांच्याही समस्येवर जिल्हा उपनिबंधकानी मार्ग काढला. एकुणच खासदारांनी घेतलेल्या बैठकीमुळे तरी शेतकऱ्यांच्या अडचणी मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp conduct meeting